अहिल्यानगर : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तीवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवल्याच्या निर्णयाचे अहिल्यानगर मूर्तिकार संघटनेने आज, सोमवारी गुलाल उधळून व मिरवणूक काढून स्वागत केले.उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मिळताच शहरातील मूर्तिकार संघटनेने नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात नतमस्तक होत तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गुलाल उधळत, ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली.
यावेळी बोलताना मूर्तिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर म्हणाले, राज्य सरकारने शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून पीओपीबद्दलचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून पीओपी वातावरणासाठी हानिकारक नसल्याचा अहवाल मागवला. तो अहवाल उच्च न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाकडे सुपूर्द केला.
या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने पीओपीवरील बंदी उठवून निर्मिती, साठवणूक, विक्री व स्थापना करण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक आहे.संघटनेने यासाठी दिलेल्या लढ्यात मदत करणारे वसंत लोढा, बापू ठाणगे, कायदा सल्लागार भगवान जगताप, हिंदुत्ववादी संघटना व तरुण मंडळांना धन्यवाद दिले आहेत.