अहिल्यानगर : हवामान विभागाने नगर जिल्ह्यासाठी मंगळवारपर्यंत (दि. २३) पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, काल शनिवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील पुरात एक तरुण वाहून गेला. अतुल रावसाहेब शेलार (वय ३१, रा. शिरापूर, ता. पाथर्डी) असे त्याचे नाव आहे. आज, रविवारी दुपारपर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.
जिल्ह्याच्या विविध भागांत रोज पाऊस सुरू आहे. त्यातून शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी शेती जलमय झाली आहे. गेल्या आठवड्यात पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे तालुक्यांना पावसाने झोडपून काढले होते. त्यावेळी पाथर्डीत दोघे तर नगर तालुक्यात एक जण असे तीन जण वाहून गेले होते.
काल पुन्हा पाथर्डीला पावसाने झोडपले. शिरापूर नदीला आलेला पुरात अतुल शेलार वाहून गेला. तिसगाव-शिरापूर- घाटशिरस या रस्त्यावर पुलावरून पाणी वाहत होते. शेलार हा पूल ओलांडत असताना त्याचा तोल जाऊन तो पुराच्या पाण्यात पडला व वाहून गेला. माहिती मिळताच तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, शेलार याचा शोध लागला नाही.