अहिल्यानगर : गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, गावांच्या पाणी योजना, रस्ते, पाझर तलाव, बंधारे अशा विविध सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. प्राथमिक शाळांच्या १८० वर्गखोल्या, १५७ पाणी योजना, ३२६ ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग, २८८ तलाव व बंधारे यांची मोठी हानी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची ही हानी आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीची माहिती संकलित केली. त्यानुसार ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. ३० टक्केपेक्षा कमी नुकसान, ५० टक्केपेक्षा कमी व ५० टक्केपेक्षा अधिक झालेले नुकसान अशा स्वरूपात जिल्हा परिषदेने माहिती संकलित केली आहे. त्यानुसार तीस टक्क्यांच्या आतमध्ये ८ कोटी ५३ लाखांचे, ५० टक्क्यांपेक्षा आतील ५ कोटी ५२ लाखांचे तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक ३ कोटी ६९ लाखांचे याशिवाय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे ४ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. पाथर्डी, शेवगाव, नेवासा, कर्जत, जामखेड, नगर या तालुक्यांमधून नुकसानीचे प्रमाण अधिक आहे.

प्राथमिक शाळांच्या १८० वर्ग खोल्यांना हानी पोहोचली. वर्गखोल्यांच्या भिंती, संरक्षण भिंती कोसळणे, स्लॅब, छत गळू लागणे, स्वयंपाक गृह, स्वच्छतागृहांचे नुकसान झाले. अशाच प्रकारे ७५ अंगणवाड्यांची, ५५ ग्रामपंचायत कार्यालयांचे, १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे, ३ पशुवैद्यकीय दवाखान्यांचे, १२ समाजमंदिरांची हानी झाली आहे. पुराचे पाणी स्मशानभूमीत गेल्याने एकूण १०० स्मशानभूमींचे नुकसान झाले. ११ समाजमंदिरांचे, गावांतर्गत रस्ते ७१, ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग ३२६, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे ८८ रस्ते व पूल यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे भाग, पुलांचे जोड रस्ते वाहून गेले आहेत.

विहिरी गाळाने भरल्या

विविध गावांच्या १५७ पाणी योजनांना पुराचा फटका बसला. या योजनांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी गाळाने भरल्या गेल्या. तेथील गाळ काढावा लागणार आहे. सौरपंप, उपसा योजनांची दुरुस्तीची, दाबनलिका व वितरण व्यवस्थेतील जलवाहिन्या वाहून गेल्या. पंपगृहांची दुरुस्त, पिण्याच्या पाण्याची योजना असलेल्या २ सार्वजनिक विहिरी कोसळल्या.

शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठवला

जिल्हा परिषदेच्या मालमत्तेची अतिवृष्टीने झालेल्या हानीची माहिती संकलित करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे. तातडीची दुरुस्ती व खर्च कमी आहे, अशा कामांसाठी ‘डीपीसी’कडे निधीची मागणी केली आहे. मोठ्या निधीची आवश्यकता आहे, अशा कामांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले आहेत. जिल्हा परिषदेने लघुपाटबंधारेंच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पाथर्डीत कामांना सुरुवातही झाली आहे. -आनंद भंडारी, सीईओ, जिल्हा परिषद.

पाथर्डीत १३६ तलाव बंधाऱ्यांची हानी

पाझर तलाव, गाव तलाव, साठा बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे फुटले किंवा त्यांची हानी झाली, गळती सुरू झाली. अशा एकूण २८८ तलाव, बंधाऱ्यांची हानी झाली. त्यामध्ये पाझर तलाव ९३, साठा बंधारे १६५, कोल्हापूर पद्धतीचे ३० बंधारेंचा समावेश आहे. एकट्या पाथर्डी तालुक्यातच १३६ व शेवगावमधील संख्या ६५ आहे.