अहिल्यानगर : गणरायाचा जयघोष करत, ढोल-ताशांच्या निनादात, गुलालाची उधळण करत विसर्जन मिरवणुकांनी नगर शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची सांगता झाली. नगर शहरात बहुसंख्य मंडळांनी मिरवणुकीत ‘आवाजाच्या भिंती’ उभारून दणदणाट केला. मिरवणुकीवर महापालिकेच्या निवडणुकीचे सावट पडलेले होते. राजकीय नेत्यांसह उमेदवारीसाठी इच्छुकांचे फलक मिरवणुकीत झळकवले जात होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मिरवणूक शांततेत मात्र वेळापत्रक झुगारत पार पडली. शहरातील मुख्य मिरवणुकीसाठी १६ मंडळांनी अर्ज केले होते, प्रत्यक्षात १३ मंडळेच सहभागी झाली. विसर्जन मिरवणुकीतील मंडळांचा सहभाग कमी होत चालला आहे. त्याऐवजी बडी मंडळे प्रतिष्ठापनेच्या मोठ्या मिरवणुका काढू लागली आहेत.

नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरातील उत्सवमूर्तीच्या उत्थापनाची पूजा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते केल्यानंतर फुलांनी सजवलेला रथ सेवेकऱ्यांनी ओढत रामचंद्र खुंटावर मिरवणुकीसाठी आणला. हे आगमनच मुळात उशिरा झाल्याने मिरवणुकीस विलंब झाला. मिरवणूक मार्गावर उत्सवमूर्तीच्या आरती, पूजा व प्रसादासाठी भाविकांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळेही प्रचंड विलंब झाला. देवस्थानचा रथ काल, शनिवारी रात्री पावणेनऊ वाजता दिल्लीगेट येथून बाहेर पडला. देवस्थानच्या रथापुढे मिरवणूक मार्गावर, चौकाचौकात रंगसंस्कृती गटाच्यावतीने रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज, अध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्यासह विश्वस्त सहभागी होते.

देवस्थानच्या रथापुढे सनई चौघडा, अबदागिरी घेतलेले तरुण, मर्दानी खेळाचा डाव सादर करणारी मुले व मुली, लेझीम पथक, दोन ढोल पथक सहभागी होते. त्यामागे माळीवाडा, संगम, दोस्ती, नवजवान, महालक्ष्मी, कपिलेश्वर, नवरत्न, समझोता, नीलकमल, आदिनाथ, दोस्ती ही मंडळे सहभागी झाली होती. यातील नऊ मंडळांनी आवाजाच्या भिंती निर्माण करून दणदणाट केला, प्रखर प्रकाशझोत सोडले जात होते.

रात्री दहा वाजेपर्यंत केवळ तीन मंडळांच्या गणेशमूर्तींचे बाळाजी बुवा विहिरीत विसर्जन झाले होते. त्यावेळी अखेरचे मंडळ तेलीखुंटावरच होते. रात्री बारा वाजता मंडळांनी मिरवणूक मार्गावरच आरती करून मिरवणूक संपवली, नंतर शांततेत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दोन मंडळात अंतर पडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसले नाहीत.

राजकीय छब्या

गणेश मंडळ कोणत्या राजकीय पक्ष किंवा पदाधिकाऱ्यांच्या वर्चस्वाखालील आहे हे दाखवण्यासाठी नेत्यांसह व मनपा निवडणुकीतील इच्छुकांच्या छबीसह फलक लावलेले होते. मंडळांसमोर नाचणारे कार्यकर्तेही फलक घेऊन नाचत होते अनेकांनी नेत्यांच्या छबीचे टी-शर्ट परिधान केले होते. मिरवणूक मार्गावरही आमदार- खासदार, राजकीय पदाधिकाऱ्यांचे फलक झळकवले गेले होते. त्यामुळे शहरात मनपा निवडणुकीचे वेध लागल्याचे चित्र मिरवणुकीतून स्पष्टपणे जाणवत होते.

मंडळांची परस्परांकडून अडवणूक

विसर्जन मिरवणुकीत प्रेक्षकांना आकर्षित करणारे खास काही नव्हते, होता तो केवळ आवाजाच्या भिंतींचा दणदणाट. बहुसंख्य मंडळांना कापड बाजार, भिंगारवाला चौक, अर्बन बँक रस्ता, नवीपेठ, चितळे रस्ता यादरम्यानच जास्तीतजास्त रेंगाळण्याची हौस होती. त्यामुळे पाठीमागील मंडळांची कुचंबणा होत होती. रात्री आठ वाजता आडते बाजार ते तेलीखुंट दरम्यान अडकलेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मंडळांना पुढे काढण्याची विनंती केली. या मार्गावर मंडळे एकमेकांची अडवणूक करत असल्याचे चित्र दरवर्षी दिसते.

खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर झुंबड

मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा खाद्यपदार्थ व खेळणी विक्रेत्यांनी दुपारपासूनच स्टॉल लावले होते. तेथे नागरिकांची झुंबड उडाली होती. आदर्श व्यापारी संघटना व भगवान महावीर चषक परिवारातर्फे मिरवणूक मार्गावर नियुक्त केलेले एक हजार पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांना पुरी-भाजी पाकिटाचे वाटप केले. विश्व हिंदू परिषदेनेही पाणपोई व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली होती. विविध मंडळांनी मिरवणूक मार्गावर प्रसादाचे वाटप केले.

कृत्रिम कुंडांचा उपयोग

महापालिकेसह विविध संस्था संघटनांनी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विविध भागात कृत्रिम कुंडांची निर्मिती केली होती. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिकांनी घरगुती गणपती विसर्जनासाठी घेतला. बुरुडगाव रस्त्यावरील साईउद्यान येथील कृत्रिम कुंडामध्ये साडेसात हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सावेडीतील उपक्रम

सावेडी उपनगरात तालयोगी ढोल- ताशा पथकाने ‘अनंतदर्शन यात्रा’आयोजित करत घरोघरीच्या मूर्तींचे विसर्जनासाठी संकलन करणारी मिरवणूक काढली. पथकाचे वादन पाहण्यास-ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. प्रोफेसर कॉलनी चौकातून निघालेली ही मिरवणूक कुष्ठधाम- भिस्तबागमार्गे वाणीनगरमधील विसर्जन विहिरीकडे नेण्यात आली. सावेडीत स्वतंत्र विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

दणदणाटचे नऊ गुन्हे

मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांनी रात्रीच नऊ मंडळाच्या ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेतल्या. मात्र आज, रविवारी सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात सुरू होती. यातील काही ध्वनिक्षेपकांचे मालक व वाहन चालकांविरुद्ध गेल्यावर्षीही गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई प्रभावी ठरत नसल्याचे दिसत आहे.