अहिल्यानगर: श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींवरून पुन्हा एकदा ग्रामस्थांत नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन स्थानिक नेते, सुधीर नवले आणि शरद नवले यांच्यात थेट वाद उद्भवला. हा वाद हातघाईपर्यंत जाऊन शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचला. मध्यस्थीअंती आता १६ जून रोजी सामंजस्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महिनाभरापूर्वी भेर्डापूर येथील महिलांनी पाण्याच्या समस्येबाबत बाबासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केले होते. योजनेचा निकृष्ट दर्जा आणि अपूर्ण कामामुळे पाणीपुरवठा न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. ठेकेदाराने काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र महिन्यानंतरही कामात कोणतीही सुधारणा न झाल्याने पुन्हा ग्रामस्थांनी पंचायत समितीत धाव घेतली.

गुरूवारी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्यासमोर बाबासाहेब पवार व ग्रामस्थांनी व्यथा मांडली. त्याचवेळी सुधीर नवले आणि शरद नवले हे दोघेही तिथे आले. ठेकेदाराच्या भूमिकेवरून वाद पेटला. शरद नवले यांनी, काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का नाही? असा प्रश्न केला. त्यावर सुधीर नवले यांनी शासनाच्या नियमांतील अडचणी आणि निधीअभावी काम रखडल्याचे सांगितले. यातून दोघांत वाद वाढून प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

दोन्ही गटांच्या फिर्याद देण्याच्या हालचाली असताना, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पठारे, गिरधर असणे, राजेंद्र पाऊलबुद्धे, बाळासाहेब तोरणे आदींनी मध्यस्थी करत दोघांना चर्चेसाठी राजी केले. शेवटी, दोन्ही गटांत १६ जून रोजी एकत्र बैठक घेऊन वाद मिटवण्याचा निर्णय झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद नवले हे भाजपचे कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, बेलापूर ग्रामपंचायत गावकरी मंडळाचे नेते आहेत तर सुधीर नवले हे बाजार समितीचे सभापतीव काँग्रेसचे नेते आहेत.