Ruhinaz Shaikh Speech at AIMIM Rally : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएआयएम) या पक्षाने गुरुवारी (९ सप्टेंबर) आहिल्यानगर येथे मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी व छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. यावेळी ओवैसी व जलील यांनी मेळाव्याला उपस्थित एमआयएमच्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते व समर्थकांना संबोधित केलं. मात्र, पक्षाच्या एका पदाधिकारी महिलेने केलेल्या भाषणाने सर्वांचं लक्ष वेधलं. या महिलेचं नाव रुहिनाझ शेख असं आहे.
रुहिनाझ शेख यांनी मंचावर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या नावाने घेषणा दिली आणि पुढची दोन मिनिटं छोटेखानी भाषण केलं. या भाषणाद्वारे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच त्या म्हणाल्या, “काही लोकांच्या भुवया उंचावल्या असतील की एक बुरखेवाली इथे येऊन शिवरायांच्या नावाने कशी घोषणा देते. त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की शिवरायांच्या स्वराज्यात, त्यांच्या कार्यात अठरापगड जाती व बारा बलुतेदार होते, त्यात मुस्लीमही त्यांच्याबरोबर होते. परंतु, काहीजण त्यातील मुस्लीमांचं योगदान पुसण्याचा प्रयत्न करू पाहतात. आम्हाला बाजूला करु पाहतात, त्यांना मी सांगू इच्छिते की आम्ही इथून (महाराष्ट्र) एक इंचही हटणार नाही.”
“आम्ही महाराष्ट्रातून एक इंचही हटणार नाही”
रुहिनाझ शेख म्हणाल्या, “जय भीम, जय शिवराय! मी जय शिवराय बोललल्यावर अनेकांना वाटलं असेल की ही बुरखेवाली इथे जय शिवराय कसं बोलते. कारण ते विसरले असतील की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती व बारा बलुतेदारांना आपल्याबरोबर घेतलं आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यातून मुसलमानांना हटवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. त्या कारस्थानी लोकांना मी सांगू इच्छिते की आम्ही येथून इक इंचही मागे हटणार नाही, मतांसाठी विकले जाणार नाही.”
आमच्या मतांच्या भीकेवर निवडून आलेले द्वेषाच्या वातावरणात शांत : रुहिनाझ शेख
एआयएमआयएमच्या पदाधिकारी म्हणाल्या, “अलीकडे महाराष्ट्रात नवं वातावरण तयार झालं आहे. आमच्याबद्दल द्वेष पसरवला जात आहे. असं असताना जे लोक आमच्या मतांची भीक घेऊन निवडून आले ते शांत आहेत आणि ज्यांना आमच्या मतांची भीक मिळाली नाही त्यांच्याबद्दल तर न बोललेलं बरं.”