Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या परखड आणि तेवढ्याच आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने जर कामात कुचराई केली तर ते त्याला लगेच धारेवर धरतात. पुण्यातल्या विविध बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेतच. अशात आता पुण्यात अजित पवारांनी ( Ajit Pawar ) पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला धारेवर धरलं. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. अजित पवार हे कायमच त्यांच्या खास अशा सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात, त्याचाच प्रत्यय पुण्यातल्या PWD खात्याच्या अधिकाऱ्यांना आज आला आहे.
जीएसटी भवनाच्या इमारतीचं अजित पवारांकडून उद्घाटन
पुण्यातील जीएसटी भवनच्या इमारतीचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. वडगावशेरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामांचंही भूमिपूजन अजित पवारांनी केलं. उद्घाटनानंतर अजित पवारांनी बारकाईने तिथली पाहणी केली. अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केलेली नाहीत किंवा ती लवकर आवरण्यासाठी सारवासारव केली. ही बाब अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) नजरेतून सुटली नाही. त्यांनी तिथेच त्यांना खडे बोल सुनावले
हे पण वाचा- Ajit Pawar : “जुन्या गोष्टी…”; पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचे उत्तर
नेमकं काय घडलं?
अजित पवार ( Ajit Pawar ) इमारतीच्या उद्घाटनासाठी गाडीतून खाली उतरले. इमारतीकडे जाताना पहिल्याच पायरीला सिमेंट होते. ते सिमेंट व्यवस्थित साफ केलेले नव्हतं. ते सिमेंट पाहून अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्याला विचारलं की असं का राहिलं आहे? त्यावर सिमेंट काढायचं राहिलं आहे असं तो अधिकारी म्हणाला. हे उत्तर ऐकून अजित पवारांचा पारा चढला, ते म्हणाले, हे मला काढायला ठेवलं का? तुम्हाला माहीत आहे ना मी बारकाईने सगळं बघतो? मग हे कशाला ####*** ठेवलं का? असं अजित पवार म्हणाले.
ड्रेनेज चेंबर पाहूनही चिडले अजित पवार
यानंतर जेव्हा अजित पवार पुढे गेले तेव्हा इमारतीच्या आतल्या बाजूला मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मध्येच होतं ही बाब त्यांच्या लक्षात आली. हे पाहून अजित पवार पुन्हा चिडले. ही असली छाछूगिरी करु नका असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना ऐकवलं. इमारतीचं बांधकाम पाहताना अशा पद्धतीने दोनवेळा त्यांचा संताप झाला आणि ते अधिकाऱ्यांवर चिडले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना अजित पवारांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीने अनेक अधिकाऱ्यांना झापलं आहे. कॅमेरे सुरु आहेत याची पर्वाही अजित पवार करत नाहीत. आज पुण्यात घडलेले हे दोन्ही प्रसंग कॅमेरात कैद झाले आहेत.