कराड : साताऱ्याहून कोल्हापूरला निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा गणेशमूर्ती मिरवणुकीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्याने पवारांना आपल्या कोल्हापूर दौऱ्यात बदल करून कराडमध्येच मुक्काम करावा लागला. या वेळी पोलिसांच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित गणेश मंडळाच्या अध्यक्षासह पाच जणांविरुद्ध कराड शहर पोलिसांत सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर येथे घडलेल्या या प्रकरणी गणपती आगमन मिरवणुकीमध्ये लेझर बीमचा (उग्र प्रकाशझोत) उपयोग करीत ध्वनिवर्धकाचा दणदणाट करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी एलईडी स्क्रीन, लेझर बीम, ध्वनिवर्धक, ट्रॅक्टर- ट्रॉलीसह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मलकापूर-जवाहरनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश व शिवजयंती उत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात आली. त्यात विनापरवाना ध्वनिवर्धक भिंती आणि एलईडी स्क्रीनचा वापर करण्यात आला. दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत ढेबेवाडी फाटा ते मलकापूर या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमुळे पुणे- बंगळूरू महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूककोंडी झाली. या कोंडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही ताफा अडकला.
पवार हे रविवारी सायंकाळी मोटारगाडीने साताऱ्याहून कोल्हापूरला निघाले होते. मात्र, या कोंडीत त्यांचा ताफा अडकला. मलकापूरपासून सातारा बाजूला तासवडेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे पवारांना नियोजित कोल्हापूर दौऱ्यात बदल करून कराडच्या शासकीय विश्रामगृहावर मुक्काम करावा लागला. या वेळी पोलिसांच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर परवानगीशिवाय लोखंडी चौकट बसवून ध्वनिवर्धकाच्या भिंती आणि एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी वारंवार आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न करताच जनरेटर व टेम्पोचालक पळून गेले. पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणा व अन्य साहित्य, तसेच ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आज याप्रकरणी संबंधित गणेश मंडळाच्या अध्यक्षासह पाच जणांविरुद्ध कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.