आमदार निवासातील कपबशी धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. याची दखल विधानसभा अध्यक्षांनीही घेतली होती. दरम्यान, या प्रकारानंतर आमदार निवासातील शौचालयाच्या दाराजवळच फळं धुतल्याच्या प्रकार समोर आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर सरकारचा वचक आहे की नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकारावरून अजित पवार यांनीही सरकारला धारेवर धरले आहे. आमदार निवासातील कपबशी शौचालयाच्या पाण्याने धुतल्याच्या घटनेची दखल स्वत: विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की या प्रकरणात कंत्राटदार, अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील, त्यांच्यावर आम्ही ताबडतोब कारवाई करण्यात येईल. मात्र, त्यानंतरही असा प्रकार घडत असेल, तर चुकीचं आहे. याबाबत सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अशा घटना सातत्याने घडत असेल तर सकाकारचा कंत्राटदारांवर वचक दिसत नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, काल अमोल मिटकरी यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्र सोडले होते. ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा हॅशटॅग वापरून अमोल मिटकरींनी यासंदर्भातील व्हिडीओ ट्वीट केला होता. “हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था,” असं अमोल मिटकरी म्हणाले होते.