राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी किंवा गर्दी होऊ नये म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी १ तास आधीच जात असल्याचंही नमूद केलं. राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या करोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “राज्यात ओमायक्रोन आजाराची संख्या वाढल्याने राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी करू नये. लग्न समारंभ देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करा. अन्यथा, ओमायक्रॉन आजाराचा धोका वाढल्यास राज्यावर लॉकडाऊन करण्याची देखील वेळ येऊ शकते.”

“…म्हणून मी कार्यक्रमाला १ तास आधीच जातो आणि उद्धाटन करतो”

यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमाला गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही, असा सज्जड इशारा दिला. तसेच मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, गर्दी कमी व्हावी यासाठी १ तास आधीच जातो आणि उद्धाटन करतो, असं नमूद केलं.

“लोक मास्क कमी लावत आहेत”

“आम्ही सकाळी नायगावला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती होती तेथे होतो. आम्ही अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. तिथंही आम्ही सरपंच, आमदार अशी सर्वांशी बैठक घेतली. तिथं मी काही बाबी कबुल केल्या आहेत आणि मी त्या देणार आहे. मात्र, लोक मास्क कमी लावत आहेत. काहीजण मास्क न लावता तेवढ्यापुरता स्वतःचा रुमाल बांधतात आणि पुढे येतात. म्हणजे मास्क त्यांच्याकडे नाहीच आहे. असं होता कामा नये, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे,” असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

“५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त, यावरून…”, अजित पवारांचा गंभीर इशारा

अजित पवार म्हणाले, “आमचं पाचच दिवसांचं अधिवेशन होतं. या ५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त झालेत. हे अधिवेशन आणखी वाढवलं असतं तर निम्मे मंत्री आणि निम्मे आमदार करोनाग्रस्त झाले असते. यावरून सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. मी तर सभागृहातील व्यक्ती माझ्या बाजूचा आहे की विरोधी बाजूचा आहे हा भेदभाव केला नाही. सगळ्यांना आवाहन केलं.”

हेही वाचा : “एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी…”, अजित पवारांचा जिल्हा बँकेच्या हौशी उमेदवारांना टोला

“हे मोठं संकट जगावर आलं आहे. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका सगळीकडे २-३ लाख रूग्णांच्या पुढे आकडे गेलेत. काही ठिकाणी बेड शिल्लक नाहीत. आपल्याकडे ज्यांना करोना होतो आहे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागत नाही. घरीच ठेऊन नीट औषधपाणी केलं, आराम केला तर बरे होतात. असं असलं तरी प्रत्येकाने काळजी घेणं सर्वांची जबाबदारी आहे,” असंही पवारांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेची तयारी केली असल्याचंही नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar declared will not attend program of crowd amid corona infection pbs
First published on: 03-01-2022 at 16:58 IST