राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांसह त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदी तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडखोरीनंतर पक्षात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून आता पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून उद्या (बुधवार, ५ जुलै) मुंबईत बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईतील एमईटी, भुजबळ नॉलेज सिटी येथे या बैठकीचं आयोजन केलं आहे. अजित पवार गटाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आजी-माजी आमदार -खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असं आवाहन अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे. या बैठकीत नेमका कोणता निर्णय होणार? अजित पवार गटाची पुढची रणनीती काय असेल? याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर बंडखोरीचं चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.