राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या अजित पवार गटातील समावेशाचा मुद्दा सध्या चर्चेचा ठरला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांचा सरकारमध्ये समावेश मान्य नसल्याचं अजित पवारांना थेट पत्र लिहून कळवलं असताना दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते मात्र नवाब मलिक अद्याप आमच्याकडे आले नसल्याचं सांगत आहेत. खुद्द अजित पवारांनीही अशाच प्रकारची भूमिका मांडलेली असताना आता अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे देवेंद्र फडणवीसांच्या पत्रात?
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांच्या सरकारमधील समावेशाला भाजपाचा विरोध असल्याचं म्हटलं आहे. शेवटी “आमच्या भावनांची आपण नोंद घ्याल”, असंही फडणवीसांनी पत्रात म्हटलं. या पत्रावरून सध्या वाद निर्माण झाला असून फडणवीसांनी पत्र जाहीर करायला नको होतं, वैयक्तिक भेट घेऊन सांगायला हवं होतं अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाकडून आली आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रफुल्ल पटेलांनी त्यावर सविस्तर भूमिका मांडली आहे.
“देवेंद्र फडणवीसांकडे अजित पवारांचा फोन नंबर…”, जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “भाजपाची अडचण झालीये!”
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांशी बोलताना या सर्व मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा वेगळा अर्थ काढू नका, असं प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे. “विधानसभेत कुठे बसले, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यांच्याकडे विधानसभेत बसण्याचा अधिकार आहे. शिवाय विधानसभेत कुणाला भेटल्यानंतर ते आमच्याकडे आल्याचं म्हणणं म्हणजे दिशाभूल करणारी बाब आहे. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं असेल तर त्याचा फार काही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही”, असं प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.
“जे घडलं ते सगळ्यांना माहिती आहे. नवाब मलिक या काळात कुणाच्याही बरोबर नव्हते. त्यांचा या सगळ्याशी काहीही संबंध आला नाही. वैद्यकीय कारणासाठी त्यांना जामीन मिळाल्यानंतर सगळेच त्यांना भेटायला गेले. सहकाऱ्याच्या प्रकृतीची विचारपूस करणं हे आमचं कर्तव्य होतं”, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
“आम्हाला त्यांच्याशी राजकीय चर्चा करायची नाहीये”
दरम्यान, अजित पवार गटाला नवाब मलिक यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा करायची नाहीये, असंही प्रफुल्ल पटेलांनी यावेळी नमूद केलं. “विधानसभेत ते आमदार म्हणून आल्यानंतर जुने सहकारी एकमेकांना भेटणं स्वाभाविक आहे. नवाब मलिकांची भूमिका काय आहे यासंदर्भात आम्ही चर्चा केलेली नाही. ते वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे आम्हाला यावर त्यांच्याशी चर्चा करायची नाहीये. आम्ही त्यांच्याशी कोणतीच राजकीय चर्चा केलेली नाही. त्यांच्या प्रकृतीची भेट घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतलेली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिकांची काय भूमिका असेल, यावर मी भाष्य करू इच्छित नाही”, असं ते म्हणाले.
“फडणवीसांच्या पत्राचं काय करायचं ते…”, अजित पवारांनी नवाब मलिकांबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…
“विरोधक हताश होऊन दुसरा कुठला मुद्दा नसल्यामुळे हे सगळं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगाकडे आम्ही नवाब मलिकांशी संबंधित कोणतीही कागदपत्र दिलेलं नाही”, असं पटेल यांनी स्पष्ट केलं.
विशेष अग्रलेख – नवाब मलिक नकोत; पुढे?
अशोक चव्हाणांना टोला
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी पत्र न लिहिता थेट अजित पवारांशी बोलायला हवं होतं, अशी भूमिका मांडणारे काँग्रेस आमदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पटेल यांनी टोला लगावला आहे. “ज्यांनी सल्ला द्यायची गरज नाही तेही सल्ला देत आहेत. त्यांनी आपला पक्ष आधी व्यवस्थित चालवावा. दुसऱ्या लोकांना सल्ला देण्यात काय अर्थ आहे? पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरून हे स्पष्ट झालंय की काँग्रेसमध्ये आता सामना करण्याची क्षमता राहिलेली नाही”, असं पटेल म्हणाले.