सोलापूर : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे (वय ३२) यांना कौटुंबिक कारणांवरून त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते, माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे यांच्यासह ओंकार यांची पत्नी व सासरच्या मंडळींविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मृत ओंकार हजारे (रा. निराळे वस्ती, सोलापूर) हे गेल्या ८ जून रोजी जुनी मिल चाळीजवळील पापय्या तालमीसमोर रस्त्यावर आपल्या मोटारीत बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते.दरम्यान, त्यांचे बंधू विशाल हजारे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, चौकशीअंती गुन्हा नोंदविण्यात आला. यात ओंकार यांची पत्नी स्वाती, त्यांचे वडील ज्ञानेश्वर पवार, आई राजश्री पवार, भाऊ मंगेश पवार, तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते पद्माकर ऊर्फ दादा काळे यांची नावे संशयित म्हणून समोर आली आहेत.
मृत ओंकार आणि स्वाती यांचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यास स्वाती यांच्या माहेरच्या मंडळींनी विरोध दर्शविला होता. त्यातूनच ओंकार यांना त्रास देण्यास सुरुवात झाली. दरम्यान, ओंकार आणि स्वाती यांच्यात वाद वाढून दोघेही विभक्त राहत होते. पत्नीने घटस्फोटाची मागणी केली असता मृत ओंकार यास राजी नव्हते. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास देणे सुरू केले. त्यामुळे कंटाळून ओंकार यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, काळे यांनी गुन्ह्याचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळला. हजारे आणि पवार कुटुंबीयांचा घरगुती कारणांवरून वाद होता. त्यात आपला संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.