भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी शुक्रवारी मिरजेत जेसीबीच्या मदतीने दहा दुकानं उद्धवस्त केली आहेत. शुक्रवारी (६ जानेवारी) पहाटे ब्रम्हानंद पडळकर यांनी जवळपास १५० लोकांचा जमाव आणि जेसीबीच्या साह्याने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राजकीय नेत्यांसह त्यांच्या नातेवाईकांची कानउघडणी केली. कोल्हापूर येथे एका भाषणात अजित पवार म्हणाले, “काल एका आमदाराच्या भावाने मिरजेमध्ये काहीतरी घोळ करून ठेवला आहे. त्याने जेसीबी घेऊन काहीतरी केलं. त्याने नेमकं काय केलं? हे मला अजून नीट माहिती नाही. कारण मी पहाटेच इकडे आलो. संबंधित प्रकरणाची दुपारी माहिती घेणार आहे.”

हेही वाचा- एकनाथ शिंदेंनी कवाडेंना युतीत घेतल्याने रामदास आठवलेंची नाराजी; म्हणाले, “मी त्या दोघांशी…”

“पण आम्हीही एखाद्या पदावर बसतो, तेव्हा आमच्या जवळच्या नातेवाईकांनीही नीट वागलं पाहिजे. आम्हाला आमदारकी, खासदारकी किंवा विरोधी पक्षनेते पदं मिळाली म्हणजे आम्हाला शिंगं आलेली नसतात. आमच्याही लोकांनी जमिनीवर पाय ठेवून काम केलं पाहिजे. तेच सध्याच्या काळात होताना दिसत नाही. त्याचा विचार महाराष्ट्रातील जनतेनं केला पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याकडेला असलेली दहा दुकाने शुक्रवारी पहाटे चार जेसीबी यंत्राच्या माध्यमातून उद्धवस्त करण्यात आली. यामध्ये सुमारे एक कोटी साडेतेरा लाखाची हानी झाली आहे. जागा मालकीवरून हा प्रकार घडला असून या प्रकरणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १५० जणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- “सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”, पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरज शहरी बसस्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर काही दुकाने, हॉटेल, औषध दुकान गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ आहेत. ही जागा पडळकर यांनी विकत घेतली असल्याचा दावा केला जात आहे. या दुकानांना जागा खुली करण्याचे प्रयत्न सुरू होते. यातून गेले काही दिवस हा वाद सुरू होता. शुक्रवारी पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास अचानक चार जेसीबी आणून या जागेत कार्यरत असलेली दहा दुकाने पाडण्यात आली. यामध्ये दुकानात असलेले साहित्य, फर्निचर, वातानुकलित यंत्र यांच्यासह इमारतीचाही चुराडा करण्यात आला.