Ajit Pawar on Mahayuti Maharashtra Assembly Election 2024 : आमचा पक्ष पुरोगामी विचारांचा आहे, असा दावा करणाऱ्या अजित पवारांची महायुतीमधील नेत्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकांमुळे अनेकदा गोची झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील एका प्रचारसभेत बोलताना ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत हिंदू समुदायाला सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र, “आम्हाला ही घोषणा मान्य नाही”, असं अजित पवारांन स्पष्ट केलं आहे. महायुतीतील भाजपा व शिवसेना (शिंदे) हे हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आहेत. अजित पवारांच्या पक्षाची विचारधारा याहून वेगळी असल्यामुळे त्यांच्यावर बऱ्याचदा युतीतील नेत्यांकडूनच टीका होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपयश पाहावं लागल्यानंतर भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या पराभवाचं खापर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर फोडलं होतं. निवडणुकीच्या प्रचारातही राष्ट्रवादीच्या वेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहेत. तरीदेखील अजित पवार महायुतीबरोबर का आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर स्वतः अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “मी सहमत नाही. मला ते मान्य नाही. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे लोक आहोत. या विचारांवर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि यापुढेही राहू”. यावर अजित पवारांना विचारण्यात आलं की तुमच्या पक्षाच्या व भाजपा-शिवसेनेच्या (शिंदे) विचारधारा, भूमिका वेगळ्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? यावर अजित पवार म्हणाले, “आमच्या (महायुतीतील पक्ष) विचारधारा वेगळ्या नाहीत. आमच्या सरकारने दीड वर्षात अल्पसंख्याकांसाठी जितके निर्णय घेतले, तितके निर्णय आजवर कोणी घेतले नाहीत. या निर्णयांमध्ये आम्ही तिन्ही पक्ष सहभागी आहोत”. अजित पवार एबीपी माझाशी बोलत होते.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : “मी ऑन कॅमेरा सांगतेय की…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तडजोडी कराव्या लागतात : अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “पक्षांच्या भूमिका थोड्या वेगळ्या असल्या तरी सध्या महाराष्ट्रात तशी स्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची व काँग्रेसची विचारधारा भिन्न आहे. हे दोन पक्ष कधी एकत्र येतील असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. विचारधारा वेगळ्या असल्या तरी युती-आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार केलेला असतो. त्यावर सरकार चालत असतं. राज्याच्या व जनतेच्या भल्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. याआधी आम्ही (राष्ट्रवादी) महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अडीच वर्षे तशा तडजोडी केल्या आहेत”.