सांगली : शरद पवार यांनी गेली साठ वर्षे राजकीय क्षेत्रात काम केले आहे. या काळात अनेकवेळा त्यांच्यावर टीका झाली, मात्र त्यांनी कधीही कमरेखाली वार केले  नाहीत. यशवंतराव चव्हाणांच्या पठडीत तयार झालेल्या पवार यांनी टीका होत असतानाही कधीही आपला तोल ढळू दिला नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री, देशाचे  कृषिमंत्री म्हणून राज्याला व देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. तरीही काही विकृत मनोवृत्ती त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. केतकी चितळेबाबत राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुहास कदम यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत त्यांनी सांगितले, असा काही  पक्षाने फतवा काढलेला नाही. घटनेने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य  दिले असले तरी यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही  याची खबरदारी घेण्याची गरज  आहे. माध्यमातूनही विकृतीला अनावश्यक प्रसिध्दी दिली जात असल्याचा आक्षेप पवार यांनी यावेळी घेतला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईमध्ये झालेल्या भाषणामध्ये पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करीत भाजपवर टीका केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, सरकार स्थापन होऊन अडीच वर्षांचा कालावधी झाला असून पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. या घटनेबाबत जोपर्यंत अजित पवार यांच्या मनात येत नाही तोपर्यंत काही  बोलणार नाही. हा शपथविधी सकाळी आठ वाजता झाला होता, त्याला तुम्ही पहाट कसे काय  म्हणता, असा सवाल करीत आमच्याकडे चार, पाच  वाजता पहाट होते असे सांगत यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी स्पष्ट नकार  दिला.

दरम्यान, सांगली महापालिकेला विकासकामासाठी शंभर कोटींचा निधी देण्यात येईल, यापैकी २५ कोटींचा निधी तातडीने देण्यात येईल. मात्र या निधीतून सार्वजिनक आरोग्याची कामे करण्यात यावीत असा सल्ला पवार यांनी दिला. ज्या कामासाठी निधी  दिला आहे तेच काम करणे आवश्यक असून या निधीतून रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामे करता येणार नाहीत. कारण ही कामे करण्यामागे काही तरी  स्वार्थ दडलेला असतो. याला काही तरी कायदेशीर बंधन घालण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे समाजस्वास्थ्याला हानिकारक – अजित पवार

सांगली : जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची वृत्ती बोकाळत असून हे समाजस्वास्थ्याला हानिकारक आहे. यामुळे अशा प्रवृत्तीपासून समाजाने सावध राहायला हवे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले.

सांगलीतील नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण भारत जैन समाजाच्या शताब्दी अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम, खा. संजयकाका पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटील तर राज्यमंत्री राजेंद्र  पाटील-यड्रावकर स्वागताध्यक्ष होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी जैन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पावसाळी अधिवेशन चालू होण्यापूर्वी मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात येईल असे सांगितले. जैन समाज अत्यल्प भूधारक झाला असून या समाजाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी राज्य शासन निश्चित प्रयत्न करेल. जैन समाज अहिंसेच्या विचाराने चालणारा समाज आहे. मात्र, अलीकडे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे कोणालाही परवडणारे नाही. सरकारे येतील, जातील मात्र, सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहणे प्रगतीसाठी आवश्यक  आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी महावीर अध्यासन केंद्रासाठी तीन कोटींचा निधी जाहीर केला, तर राज्यमंत्री डॉ. कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. अधिवेशनाचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी अल्पसंख्याक समाजासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करावी अशी मागणी केली. यावेळी कन्नड आणि मराठी भाषेतील शांतीसागर महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.