पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपा नेत्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुनावलं आहे. ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यासाठी आल्या असून शिवसेना त्यांना मदत करत असल्याचा आक्षेप भाजपा नेत्यांनी घेतला होता. महाविकास आघाडीमधील घटक पक्षावर करण्यात आलेल्या आरोपावरुन अजित पवारांनी खडे बोल सुनावलेत.
अजित पवारांचा प्रतिप्रश्न…
महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील उद्योग हे पळवले जात आहेत अशी टीका करण्यात आली, असं म्हणत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी, “मला एक कळत नाही, इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे ते उद्योगधंदे पळवायला आले हा अर्थ कसा काय निघतो?” असा प्रतिप्रश्न केला.
तिथं उद्योजक जातात…
“उद्योगपतींना जिथं जिथं कामगार, जागा, पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधा मिळतात तिथं ते जाण्याचा प्रयत्न करतात. काहीजण रेड कार्पेट टाकतात, अतिरिक्त सवलती देतात,” असं अजित पवार म्हणाले.
नक्की वाचा >> शरद पवार- ममता बॅनर्जी भेटीवर अजित पवार म्हणतात, “राज्यात काम करणारे आम्ही काय…”
संजय राऊतांनीही केली टीका…
मुंबईवरील भाजपाचं एवढं प्रेम आहे तर मग इतरवेळी कुठं जातं? अशी विचारणा केली असून गुजराच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याची आठवण करुन दिली आहे. “मुंबई पहिल्या क्रमांकाचं औद्योगिक शहर असून आर्थिक राजधानी म्हणून ओळखतो. देशाच्या तिजोरीतील ४० हून अधिक टक्के महसूल मुंबईतून जातो. तुम्ही कितीही हे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई ही मुंबईच राहणार. ममता बॅनर्जी इथे आल्या आणि त्यांनी उद्योजकांची भेट घेत मुंबईप्रमाणे बंगालच्या विकासातही योगदान द्या असं आवाहन केलं. यात चुकलं काहीच नाही. हा देशाचा विकास असून एखाद्या राज्याचा, शहराचा विकास हा आम्ही देशाचा विकास मानतो. मग तसा विकास उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचाही व्हावा,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> ओमायक्रॉनसंदर्भातील नियमांवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने?; अजित पवार म्हणतात…
तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत?
“ममता बॅनर्जींनी इथे आल्यानंतर आमची, उद्योगपतींची भेट घेतली. पण त्या आल्यानंतर भाजपाने ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या आहेत, उद्योग पळवून नेण्यासाठी आल्यात असा तांडव सुरु केल आहे. कोणी पळवले उद्योग? हिंमत आहे का कोणाची? सर्व उद्योग मुंबईतच राहणार. पण जर याव्यतिरिक्त कुठे गुंतवणूक करायची असेल तर ती बंगालमध्ये करा. ही अशी पद्धत आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, “पण मग मुंबईवर एवढं प्रेम आहे तर मग इतरवेळी कुठं जातं? चार पाच वर्षांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल इथे आल्या होत्या. आल्यानंतर त्यांनी मुंबईची बदनामी सुरु केली होती. काय इथले रस्ते, खड्डे…उद्योगपतींनो गुजरातला चला, मुंबईत काय ठेवलं आहे? ही त्यांची भाषा…तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत? तेव्हा तोंडाचा मुरंबा का झाला होता?”.
लाथा घालण्याची वेळ आली आहे
“ममता बॅनर्जी काल गेल्या असतील आणि आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल आपलं अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत बसले आहेत. व्हायब्रंट गुजतरासाठी मुंबईत येऊन थांबले आहेत. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी रोड शो वैगेरे ठेवले आहेत. हा काय प्रकार आहे…तुम्ही ममतांविषयी बोलता मग आमची मुंबई आहे, मुंबईत कशाला येता हे त्यांनाही विचारा. हे ढोंग आहे,” अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली. “काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला नेलं. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या मदतीने ते नेण्यात आलं. तेव्हा जाग का आली नाही? मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला नेण्याचा प्रयत्न झाले. एअर इंडियाचं मुख्यालय मुंबईत होतं…बंद करुन नेलं ना कुठेतरी. तेवा त्यांना जाग काय ते नाही? त्यामुळे हे जे ढोंग आहे ना त्यावर प्रहार घालण्याची, लाथा घालण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर निशाण साधला.
ममता बॅनर्जी आल्याने पोशूळ का उठला आहे हे …
“ममता बॅनर्जी, गुजरातचे मुख्यमंत्री यांना मुंबईत यायचा हक्क आहे. ते उद्योगपतींशी चर्चा करु शकतात. योगी आदित्यनाथ आले होते तेव्हा सिनेउद्योगांना तिथे चला सांगितलं होतं. तेव्हा का नाही भाजपाचे लोक बोलले? ममता बॅनर्जी आल्याने पोशूळ का उठला आहे हे माहिती आहे. जुलाब का सुरु झाले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे,” असं संजय राऊत म्हणाले.