Ajit Pawar on Harshvardhan Patil: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच उमेदवार आणि त्यांचे प्रचार याची जोरदार चर्चा चालू झाली. दोन आठवड्यांपूर्वी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षावर टीका करताना त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं होतं. त्यावरून आता अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे. इंदापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावतानाच देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर झालेल्या एका बैठकीचा प्रसंगही सांगितला.
‘अदृश्य प्रचार’ उल्लेखावरून टोला!
हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांकडे जाताना बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी अदृश्य प्रचार केल्याचं विधान केलं होतं. त्यावरून आज अजित पवारांनी भाषणादरम्यान हर्षवर्धन पाटलांना लक्ष्य केलं. “ते म्हणाले लोकसभेला मी पूर्वी प्रत्यक्ष काम करायचो. यावेळी मी अदृश्य काम केलं. अरे, अजित पवारनी आजपर्यंत कधी आयुष्यात असं काम केलं नाही. जो कुणी उभा राहील, त्याचं इमानदारीनं काम केलं. मॅच फिक्सिंग प्रकारच नाही. नाहीतर समोरच विरोध, चल. ही पद्धत चुकीची आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेऊन जेवायला घातलं. ओवाळलं. आता म्हणतायत अदृश्य प्रचार केला. याला तर आता… टांग्याचा घोडा कसा असतो, तसं…”, असा उल्लेख अजित पवारांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
‘त्या’ बैठकीत काय घडलं?
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत काय घडलं, याविषयी दावा केला. “हे लोक कुणाचेच नाहीत. हे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे आहेत. देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील आणि मी सागर बंगल्यावर बसलो होतो. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आत्ता तुम्ही सगळ्यांनी काम करा, आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय. ते (हर्षवर्धन पाटील) मला म्हणाले आमदारकीचं काय? मी म्हटलं त्याबाबत मी काही बोलत नाही. मग ते म्हणाले देवेंद्रजी निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मी म्हणालं ठीक आहे. तेही हो म्हणाले”, असा दावा अजित पवारांनी केला.
हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी कन्या अंकिता मैदानात
“आता निवडणुका जवळ आल्या आहेत. मध्यंतरी विधानपरिषदेच्या १२ जागा भरायच्या होत्या. त्यातल्या ७ जागा भरल्या. पाच बाकी आहेत. मला भाजपाच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं की आम्ही त्यांना त्या पाच जागांमध्ये घेणार आहोत. पण यांची थांबायची तयारीच नाही. सारखं कुणीतरी आता थांबून चालणार नाही वगैरे बोलत होतं. त्यांच्या पक्षानं काय करावं तो त्यांचा प्रश्न. पण आता ते भाजपा सोडून शरद पवारांच्या पक्षात गेले. सारखं दलबदलू.. तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे?” असा सवाल त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना केला आहे.