ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीची नव्याने मांडणी करणारी प्रारूप अधिसूचना (अध्यादेश नव्हे) जारी करून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संंपूर्ण राज्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणारच असं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवण काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार साताऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात मराठा आंदोलनाचं घोंगडं भिजत पडलं होतं. मराठा आरक्षणाचा मुद्दा खरंतर फार जुना आहे. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे या मागणीला धार आली होती. १ सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीतील मराठा आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यानंतर या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. तेव्हापासून या आंदोलनाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. हळूहळू राज्यातील विविध काना-कोपऱ्यातील मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळ दिलं. अखेर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजाने मांडलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> मराठा समाजाच्या हाती नेमके काय पडले?

काय म्हणाले अजित पवार?

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला साक्षीला ठेवून शपथ घेतली होती. या शपथेनुसार काल (२६ जानेवारी) रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. या चर्चेतून चांगला मार्ग निघाला, असं अजित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आपल्या प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानात दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मीही माझी भूमिका अनेकदा बोलून दाखवली होती. महायुतीच्या सरकारने, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फार कष्ट घेतले आहे. फार मेहनत केली आहे. सातत्याने चर्चा चालू ठेवून त्यातून चांगला मार्ग काढला आहे. तो मार्ग सर्वांना मान्य आहे.

हेही वाचा >> पाच महिने आंदोलनं-उपोषणं, शेकडो किमी पदयात्रेनंतर मराठा समाजाला नेमकं काय मिळालं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“याबाबत मी समाधान व्यक्त करतो. माझ्या महाराष्ट्रातील विविध जाती धर्मातील लोकांनी एक गुणागोविंद्याने राहण्याची मी प्रार्थना करतो. वेगवेगळ्या समाजाच्या रास्त मागण्या पूर्णत्वास नेण्यास महायुतीचं सरकार कटिबद्ध राहील”, असंही ते म्हणाले.