|| दिगंबर शिंदे

‘हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे ८ वाजून ३० मिनिटे झाली आहेत, आता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठी बातम्या प्रसारित करीत आहोत.. हे ८ ऑगस्टचे निवेदन झाल्यानंतर केवळ १० मिनिटांतच महापुराचे पाणी शिरले आणि आवाज अस्पष्ट झाला. मात्र जिद्द न सोडता ५७ वर्षांची अखंड प्रसारणाची परंपरा कायम ठेवून या केंद्राने सांगलीची ओळख कायम राखली.

महापुरात ध्वनिमुद्रण, प्रसारण करणारा कक्ष साडेचार फूट पाण्यात बुडाला होता. खासगी एफएम वाहिन्याचे प्रसारण सलग दहा दिवस बंद पडले. मात्र आणीबाणीच्या स्थितीत प्रसारण कक्षामध्ये तातडीने स्वतंत्र स्टुडिओची उभारणी करून सांगलीकरांना महापुराची स्थिती सांगण्याचे काम अव्याहतपणे सुरू ठेवले. सांगली आकाशवाणीने आपली ओळख कायम ठेवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

कोल्हापूर रोडवर १९६२ पासून कार्यरत असलेले सांगली आकाशवाणी केंद्र यंदा ८ ऑगस्टच्या सकाळी महापुराचे पाणी आल्याने बाधित झाले. आकाशवाणी इमारतीच्या तळमजल्यावर ध्वनिमुद्रण करण्यासाठी स्वतंत्र आवाजरहित कक्ष आहेत. त्यात साडेचार फूट पाणी शिरल्याने विशिष्ट तंत्रज्ञानाने तयार केलेल्या स्टुडिओचे नुकसान झाले असून ध्वनी प्रतिबंधित कक्ष निर्मितीसाठी वापरण्यात आलेले फ्लायवूड, अस्बेस्टॉस खराब झाले आहे. वेळोवेळी सादर केलेले संगीताचे कार्यक्रम, राजकीय नेत्यांची भाषणे, नभोनाटय़, पोवाडे, भजने, लोकगीते, भारूड असा अनमोल ठेवा तळमजल्यावर सुरक्षित ठेवण्यात आला होता.

पुराचे पाणी शिरत असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ हा अनमोल ठेवा वरच्या मजल्यावर हलवला. त्या वेळी उपस्थित असलेले तांत्रिक अधिकारी सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी सुनील कुलकर्णी, डॉ. दीपक ठोमके आदींनी वजनदार असलेली अत्याधुनिक यंत्रणा तात्काळ वरच्या मजल्यावर हलवली. यामुळे कोटय़वधीचे नुकसान टाळण्यात यश आले.

महापुराने प्रसारण बाधित होताच सांगली आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम थेट मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येत होते. तुंग येथे तात्पुरता स्टुडिओ उभा करून प्रसारण कायम ठेवण्यात यश आले.

आता तिसऱ्या मजल्यावर तात्पुरता स्टुडिओ उभा करून प्रसारण करण्यात येत असून अखंड प्रसारण करण्याची परंपरा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कायम ठेवण्यात यश आल्याचे कार्यक्रम अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी सांगितले.

याच दरम्यान सांगलीतून प्रसारित होत असलेले खासगी एफएम वाहिन्या माय एफएम, रेडिओ ऑरेंज, आपला एफएम, रेडिओ सिटी याचे प्रसारण मात्र सलग १० दिवस बंद ठेवावे लागले. सांगली आकाशवाणीचे एएम वाहिनीवरील कार्यक्रम सुरळीत असले तरी एफएम वाहिनीवरील कार्यक्रम मात्र बंद पडले होते.

महापुराने आकाशवाणीच्या तळमजल्यावर असलेले पाच स्टुडिओंचे सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले असून सर्व पूर्ववत करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या काळातही कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण करण्यासाठी आकाशवाणीने तिसऱ्या मजल्यावर तात्पुरता स्टुडिओ उभारला असून सध्याचे प्रसारण या ठिकाणाहून केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाशवाणी केंद्राच्या इमारतीत पाणी शिरल्याची माहिती प्रसार भारतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना छायाचित्रासह पाठविण्यात आली. ते छायाचित्र प्रसार भारतीच्या अधिकाऱ्यांनी ट्वीट केले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट करीत सांगली आकाशवाणीचे कौतुक केले.