फिक्की फ्रेम्सच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. गोरेगावमधल्या चित्रपटसृष्टीचं रुप आम्ही येत्या चार वर्षांत बदलणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.तसंच अनिल कपूर यांच्या भेटीचा किस्साही सांगितला. एवढंच नाही तर मोदींना विचारलेला प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खास उत्तर दिलं. कुठले प्रश्न होते आणि फडणवीसांनी कशी उत्तरं दिली? जाणून घेऊ.

अक्षय कुमारचे प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास उत्तरं

१) मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला होता की तुम्ही आंबा कसा खाता? त्याची खिल्ली उडवण्यात आली. पण मी काही सुधारणार नाही. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. तुम्हाला संत्री आवडतात का?

देवेंद्र फडणवीस : होय, मला संत्री खूप आवडतात.

२) संत्री खाण्याची योग्य पद्धत काय? तुम्ही संत्री कशी खाता? सोलून खाता की की त्याचा रस तुम्हाला आवडतो?

देवेंद्र फडणवीस : मी तुम्हाला आज एक नवी पद्धत सांगतो. संत्रं जसं आहे तसं कापा, त्यावर थोडं मीठ टाकायचं. त्याचं साल खायचं नाही पण जशी आपण आपण आंब्याची फोड खातो तसं संत्रं खा एक वेगळी मजा तुम्हाला येईल. नागपूरच्या ओजी लोकांनाच संत्रं कसं खायचं माहीत आहे.

३) मी अभिनेता म्हणून अनेक वर्षे काम करतो आहे. तुम्ही राजकारणातल्या दुनियेचे स्टार आहात. असा कुठला चित्रपट किंवा अभिनेता आहे का? ज्याचा तुमच्यावर प्रभाव पडला आहे?

देवेंद्र फडणवीस : अनेक चित्रपट मला आवडतात. शिवाय नायक सिनेमाचा किस्सा सांगतो, तो चित्रपट आल्याने मला अडचणी वाढल्या. कारण मी जिथे जातो तिथे मला लोक म्हणतात नायकसारखं काम का करत नाही? अनिल कपूर भेटले मी त्यांना म्हटलं की नायक का केलात? लोक तुम्हाला नायक आणि आम्हाला नालायक समजतात.

४) एक दिवसाचे दिग्दर्शक झालात आणि महाराष्ट्र नावाचा चित्रपट दिग्दर्शित केलात तर कुठला सीन चित्रीत कराल?

देवेंद्र फडणवीस : जर महाराष्ट्र हा चित्रपट असेल आणि त्यातला पहिला सीन चित्रीत करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी बसले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं तोच पहिला सीन असेल.

५) चित्रपटसृष्टीत रिल हिरो दिसतात, पण राजकारणातले रिअल हिरो कोण?

देवेंद्र फडणवीस : भारताच्या राजकीय इतिहासाचा विचार केला तर राजकीय हिरो मला नरेंद्र मोदी वाटतात. गरीबी हटाव चा नारा सातत्याने लागला. पण १० वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्य्र रेषेखालून वर आणण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. इतकंच नाही तर प्रत्येक क्षेत्रात भारत इतरांशी बरोबरी करतो आहे हे नरेंद्र मोदींमुळे शक्य झालं

६) तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्टुडिओजना महाराष्ट्रात बोलवायचं असेल तर काय सांगाल?

देवेंद्र फडणवीस : मी त्यांना एवढंच सांगेन की महाराष्ट्रात दादासाहेब फाळकेंपासून ते कंटेट क्रिएटरपर्यंत इतका मोठा वारसा आहे की आपण आपली मूळं सोडलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्टुडिओ इथे आणायचा असेल तर महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे सिनेमा जगला आहे.

७) जुहू ते कुलाबा हे अंतर मी काही दिवसांपूर्वी ३५ मिनिटांत कापलं. आधी खूप वेळ लागायचा. तुम्ही उत्तर आणि दक्षिण मुंबई जोडलीत कारण तुम्ही उत्तम काम केलं आहे आणि करत आहात. एक विनंती आहे ती फिल्मसिटीबाबत त्यासाठी तुम्ही काय कराल?

देवेंद्र फडणवीस : होय, लवकरच तुम्हाला हा बदल दिसेल. माझ्या मनात एक छोटी सल आहे ती अशी की २०१४ ते २०१९ या कालावधीत मला फिल्मसिटीसाठी काम करायचं होतं ते राहून गेलं. मात्र आता याची सुरुवात पुढच्या वर्षापासून हे काम सुरु होईल. मी ते ठरवलं आहे. फिल्मसिटी टॉप क्लास असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

८) मी मराठी चित्रपटांचा चाहता आहे. मराठी चित्रपटांची कथा, पटकथा इतके सुंदर असतात तसे विषय पाहण्यास मिळत नाही. जेन झीमध्ये तुम्ही हे कसं प्रसिद्ध कराल?

देवेंद्र फडणवीस : मराठी चित्रपट खूप ताकद असलेला आहे. कारण मराठी रंगभूमीने त्यांना तेवढं बळकट केलं आहे. मराठी रंगभूमीला खूप मोठी परंपरा आहे आणि त्यांना सर्जनशीलतेचा मोठा वारसा आहे. मराठी प्रेक्षकही तेवढेच चोखंदळ आणि रसिक आहेत. त्यामुळे मराठी सिनेमाही समृद्ध आहे. सध्या दशावतारची चर्चा आहे. सखाराम बाईंडरसारखं नाटक येतं ते नव्या पिढीला आवडतं आहे. मराठी जेन झी चित्रपटांशी जोडला गेला आहे. त्यासाठी आम्ही काम करत आहोत.

९) तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला गुन्हे, राज्यातल्या गुप्त गोष्टी, काळी बाजू सगळं माहीत आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे गुन्हेगारी चित्रपट हे एकमेकांचं प्रतिबिंब आहेत का?

देवेंद्र फडणवीस : मला वाटतं की राज्यातली गुन्हेगारी चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या गुन्हेगारी पेक्षा पुढे निघून गेली आहे. रस्त्यावर जोपर्यंत गुन्हे घडत होते तोपर्यंत असं दिसत होतं की लोक चित्रपटात पाहून ते अनुकरण करायचे. आताची गुन्हेगारी सायबर क्राईमची आहे. हे गुन्हेगार टेकसॅव्ही असतात. त्यांनी एक प्रश्नचिन्ह आमच्यापुढे निर्माण केलं आहे. येत्या काळात सायबर वॉर रोखणारे नायक दिसले पाहिजेत. कारण सायबर क्राईमचा हल्लाच जणू आपल्यावर झाला आहे असं दिसून येतं आहे. डिजिटल क्राईमचं मोठं आव्हान आहे.

१०) मी हैवान नावाचा चित्रपट करतो आहे, तो मी करायला हवा की नको?

देवेंद्र फडणवीस : अक्षयजी तुम्ही एक उत्तम नट आहात. तुम्ही जरुर हा चित्रपट केला पाहिजे. पण मला विचाराल तर तुम्ही नायक म्हणूनच जास्त शोभून दिसता. त्यामुळे व्हिलनची कामं फार करु नका. असं मिश्किल उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.