कराड : कराड तालुक्यातील जुने येरवळे गावात तस्कर या जातीचा दुर्मीळ ‘अलबिनो तस्कर’ सर्प आढळून आला. सर्पमित्र विशाल खंडागळे, विनोद पानस्कर, सागर बिंद्रा आणि अनिकेत यादव यांनी या ‘तस्कर’ जातीच्या सर्पाला यशस्वीपणे जीवदान दिले.
सचिन मोहिते यांना हा अनोखा सर्प दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक सर्पमित्रांना संपर्क केला. सुरुवातीला सर्पमित्रांना या सर्पाच्या रंगाबाबत काही शंका होत्या आणि त्याला नेमका कोणत्या जातीचा सर्प आहे, याची खात्री नव्हती. त्यावेळी डब्ल्यूआरके स्वयंसेवी संस्थेचे तांबवेतील प्राणिमित्र रोहित कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्पाची काळजीपूर्वक पाहणी करून हा ‘अलबिनो तस्कर’ असल्याचे सांगितले. यानंतर डब्ल्यूआरके स्वयंसेवी संस्थेचे गणेश काळे आणि योगेश शिंगण हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्पाचा अभ्यास केल्यानंतर तो कराड तालुक्यात आढळणाऱ्या पहिला आणि सातारा जिल्ह्यातील तिसरा ‘अलबिनो तस्कर’ सर्प असल्याचे नमूद केले. \
कराडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्प सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला. तस्कर सर्प हा भारतात आढळणारा निरुपद्रवी, बिनविषारी सर्प असून, सहसा करडा- तपकिरी रंगाचा असतो. आढळून आलेला सर्प ‘अलबिनो तस्कर’ असल्यामुळे पिवळसर रंगाचा होता. त्याची लांबी सुमारे चार फूट होती आणि त्याचे सरडे, पाली, उंदीर हे खाद्य आहे. निसर्गाने सापांच्या शरीरावर केलेली रंगांची अद्भुत उधळण त्यांना शिकार करण्यात व बचाव करण्यात मदत करते. दुर्मीळ व संवेदनशील अशा या सापांचे संवर्धन गरजेचे असल्याचे सर्पमित्र आणि विशेषज्ञांचे मत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील म्हणाल्या, जसा की ब्लॅक पँथर काळा बिबट्या त्याच्या जनुकीय बदलांमुळे त्याच्या शरीरातील मेलेनीन द्रव्य वाढल्यामुळे पूर्ण काळा होतो, तसाच याउलट सर्पाच्या शरीरामधील मेलेनीन द्रव्य कमी झाल्यामुळे सापाचा रंग पांढरट पिवळा होतो, या बदलामुळे याला अल्बीनो संबोधले जाते. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार तस्कर सर्पाला कायदेशीर संरक्षण आहे.