अलिबाग – रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून, नुकतेच गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह तीन जणांना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच अलिबाग शहरात बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी भुषण पतंगे याला अटक केली असून १२ लाख रुपयांच्या बनावट भारतीय नोटा आणि चलन तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अलिबाग शहरातील मध्यवर्ती भागात मयेकर वाडी एका व्यक्तीकडे बनावट नोटा असल्याची माहिती अलिबाग पोलीसांना मिळाली. अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे शुक्रवारी रात्री आपल्या पथकासह तेथे पोहोचले. माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. पोलीसांनी आतापर्यंत जवळपास १२ लाख रूपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. यामध्ये ५०० रूपये, २०० रूपये आणि १०० रूपयांच्या नोटांचा समावेश आहे. याशिवाय नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा कलर प्रिंटर, नोटा कापण्यासाठीचा कटर जप्त केला आहे. पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. आरोपीने या नोटा कुठे कुठे चलनात आणल्या, त्याचे आणखी कुणी साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपी भूषण पतंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला ६ दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक मोरे पुढील तपास करीत आहेत.
बनावट चलन हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी गंभीर धोका असून, अशा नोटा व्यवहारात आल्यास खऱ्या चलनाचे मूल्य कमी होऊन महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी संशयास्पद चलन आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बनावट चलन हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका आहे. अशा नोटा व्यवहारात आल्यास खरया चलनाचे मूल्य कमी होवून महागाई वाढण्याचा धोका असतो.अर्थव्यवस्था खिळखिळी करणारया या गंभीर गुन्हयापासून नागरीकांनी सावध आणि सतर्क राहिले पाहिजे. संशयास्पद चलन आढळल्यास पोलीसांना तात्काळ माहिती द्या. – आंचल दलाल, पोलीस अधिक्षक रायगड</p>