सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात शुक्रवारी बुडालेल्या एकूण सातही पर्यटकांचे मृतदेह अखेर सापडले असून, या दुर्घटनेतील सातही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस शोध पथकाच्या अथक प्रयत्नांना आज रविवारी यश आले आहे. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. पर्यटनासाठी आलेल्या आठ जणांपैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला असून, एक युवती सुखरूप बचावली आहे. घटनेनंतर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६) आणि जाकीर निसार मणियार (वय १३) या दोघांचे मृतदेह आज शोधून काढण्यात आले.
इरफान मोहम्मद इसाक कित्तूर यांचा मृतदेह केळुस, निवती येथील खोल समुद्रातून बाहेर काढण्यात आला. तर जाकीर निसार मणियार याचा मृतदेह नवाबाग येथून बोटीच्या सहाय्याने काढण्यात आला. नातेवाईकांनी या दोन्ही मृतदेहांची ओळख पटवली आहे. पोलिसांनी या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
मृतांची नावे
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सात व्यक्तींपैकी ५ जण बेळगाव-लोंढा येथील, तर अन्य दोघे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील होते. त्यांची नावे:
फरहान इरफान कित्तूर (वय ३४, रा. लोंढा, बेळगाव)
इबाद इरफान कित्तूर (वय १३, रा. लोंढा, बेळगाव)
नमीरा आफताब अख्तर (वय १६, रा. अल्लावर, बेळगाव)
इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६, रा. लोंढा, बेळगाव)
इक्वान इमरान कित्तूर (वय १५, रा. लोंढा, बेळगाव)
फरहान मोहम्मद मणियार (वय २०, रा. कुडाळ-पिंगुळी, सिंधुदुर्ग)
जाकीर निसार मणियार (वय १३, रा. कुडाळ-पिंगुळी, सिंधुदुर्ग) आहेत.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उप विभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबवण्यात आली. या शोधकार्यासाठी मत्स्य विभागाच्या अत्याधुनिक ड्रोनचा वापर करण्यात आला, ज्यामुळे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यास मोठी मदत झाली. पोलीस प्रशासन आणि स्थानिक मच्छीमार व लाईफ गार्ड यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
