संगमनेर : तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तनादरम्यान कीर्तनकाराच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. कीर्तनकाराने धार्मिकतेवर बोलण्याऐवजी राजकारणावर बोलणे सुरू केल्याने हा वाद उद्भवला. तालुक्याच्या शांततेत बाधा आणून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला, तर सत्ताधारी आमदार गटाने आज, सोमवारी कीर्तनकार महाराजांवर हल्ला झाल्याचा दावा करत रास्ता रोको केले. धार्मिकतेपेक्षा राजकीय दृष्टीने या प्रकरणामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
घुलेवाडी येथे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या वक्तव्याने हा वाद निर्माण झाला आहे. महाराजांना मारहाण झाल्याचा दावा आमदार गटाने करत आज रास्ता रोको केला. तेथे बोलताना आमदार अमोल खताळ हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना उद्देशून म्हणाले, संगमनेरच्या जनतेने शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केले, हे तुम्हाला सहन होत नाही. त्यामुळे तुमचे बगलबच्चे हिंदुत्वाचा प्रचार, प्रसार करणाऱ्या भंडारे महाराज यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते सहन केले जाणार नाही.
धर्मसत्तेला भेदण्याचा प्रयत्न केला, तर हिंदुत्ववादी जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी काय बोलायचे आणि काय नाही हे तुम्ही सांगू नका. तालुक्यातील भीती व दहशत विधानसभेच्या निवडणुकीतच संपली आहे. तुम्ही वेगवेगळ्या कारणाने हिंदुत्ववाद्यांना त्रास देण्याचे काम करत आहात. आगामी निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी मंत्री थोरात यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संगमनेर शांतता आणि बंधुतेचे वातावरण असणारा सुजलाम् सुफलाम् तालुका आहे. मात्र धर्माच्या व्यासपीठावरून आणि धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करत असून, तालुक्यातील वातावरण खराब करत आहेत. धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करत वातावरण खराब करत आहेत. अशा अशांतता निर्माण करणाऱ्या शक्तींना वेळीच रोखून संगमनेरची सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
हरिनाम सप्ताह वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्यासाठीचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून राजकारण होता कामा नये. मात्र, घुलेवाडी येथे तथाकथित महाराजांनी त्या व्यासपीठावरून राजकारण सुरू केले. त्याला नागरिक शांततेच्या मार्गाने विरोध करत होते. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा, भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे. निवडणूक आली, की मोर्चा काढायचा आणि वाईट, प्रक्षोभक भाषणे करायची. वातावरण खराब करायचे असा प्रयत्न काही लोकांचा आहे. आता पुन्हा निवडणुका आल्या आहेत म्हणून मोर्चा काढून वातावरण बिघडवून काही शक्तींना तालुक्याचा विकास थांबवायचा आहे, असाही आरोप थोरात यांनी केला.