अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली. कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने छापेमारी केली. यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं सांगितलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. यापूर्वी किरीट सोमय्यांनी यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेत मस्तीची भाषा केली होती. शिंदे गट आणि भाजपाला हे चौघेजण सरेंडर झाल्यावर चौकशा बंद करण्यात आल्या. पण, त्यांच्या धमकीला भिक न घालणाऱ्या नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.”

हेही वाचा : “कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या आशीर्वादाने हसन मियांचं…”, ED छापेमारीनंतर किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

“अनिल परब यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर…”

“अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊतांना त्रास दिला. आज परत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सोमय्यांनी पंगा घेतला आहे. अनिल परब यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर ही मस्तीची भाषा आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग, आयकर विभाग तुमच्या दावणीला बांधलेल्या संस्था आहेत,” असा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे.

हेही वाचा : अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, हसन मुश्रीफांचा उल्लेख करत म्हणाले “त्यांची जबान…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“२०२४ ला किरीट सोमय्यांच्या पक्षांसह हिशोब…”

“यावेळी सोमय्यांचा नेम चुकला आहे. कोल्हापुरच्या मातीशी जो नडतो, त्याला तेथील माती गाडते. तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे. तुमची तोतली जबान आहे, त्याला झणझणीत चपराक करवीरवासी देतील. शाहू भूमिच्या लाल मातीत तुमच्या पक्षासहित तुम्हाला नेस्तानाबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही. २०२४ ला किरीट सोमय्यांच्या पक्षांसह हिशोब चुकता करणार आहे. तुम्ही कितीही त्रास द्या, जनता शहाणी आहे”, असेही मिटकरींनी सांगितलं आहे.