राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोसला आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांचं पर्व मोडून काढायचं आहे अशा शब्दांमध्ये विजय शिवतारेंनी आज शरद पवार आणि अजित पवार यांचा समाचार घेतला. तसंच अजित पवारांवर जोरदार टीका करत त्यांची तुलना रावणाशी केली. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विजय शिवतारेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय शिवतारे काय म्हणाले?

“मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात आहे. सुनील तटकरे म्हणतात शिवतारेंचे स्क्रिप्ट कोण लिहून देतो ते आम्ही शोध आहोत. मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प बसलात. शरद पवारांनाही हे माहीत आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे.” असं विजय शिवतारेंनी म्हटलं आहे.

पवार पर्व संपवायचं आहे म्हणून…

बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. मी खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभा आहे असं म्हणतात. सुनील तटकरे कुणाची स्क्रिप्ट वाचतोय असं तटकरे म्हणाले. मी आज कार्यकर्त्यांना सांगतो आहे की असा नालायक आणि नीचपणा मी करणार नाही. मी लक्ष्मीनरसिंहपूरच्या देवळातही हेच सांगितलं आहे. झुंडशाही आणि घराणेशाहीच्या लढाईच्या विरोधात मी उतरलो आहे. महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला आहे. सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन पर्व सुरु करण्यासाठी मी लढाई लढतो आहे. कुणाला पाडण्यासाठी नाही तर पवार पर्व संपवण्यासाठी मी लढतो आहे.

हे पण वाचा- विजय शिवतारेंची टीका, “अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, या रावणाचा वध..”

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान आहे. याला मातीत गाडल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. शिवतारे यांची फडफड विझणाऱ्या दिव्यासारखी आहे. केवळ बार्गेनिंग पॉवर वाढवून पाच-पन्नास लाख रुपये गोळा करण्याचा सध्या ते प्रयत्न करत आहेत”, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. “शिवतारे यांच्या मागे इतर व्यक्तींचा मेंदू आहे. त्याचा तपास आम्हाला करावा लागेल. थोड्या पैशांसाठी बार्गेनिंग पॉवर वापरायची आणि कोणत्यातरी पक्षाकडून ५-२५ लाख घ्यायचे. यासाठी त्यांची तडफड सुरु आहे”, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

तुकारामांचा अभंग सांगत टीका

शिवतारे बालीश वक्तव्य करत आहेत. त्यांचा राजकीय अंत जवळ आला आहे. त्यांच्या बैठकीला कोणीही किंमत दिलेली नाही. तुकाराम महाराजांचा शिवतारेंवर अभंग आहे. ‘विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी’. विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं. तसा विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे आहे. तुमच्या भागातील मतदार मुरारबाजीच्या भूमिकेत आहेत, असंही अमोल मिटकरी यांनी सांगितले. मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त आहे. त्याच्या शिवाय हे बोलू शकत नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari gave answer to vijay shivtare also said tukaram maharaj abhang line scj
First published on: 24-03-2024 at 20:55 IST