यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा उलटफेर बघायला मिळाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं, तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. या पराभवानंतर आता भाजपाकडून मंथन सुरु झाले आहे. अशातच भाजपाच्या बैठकीत काही नेत्यांनी या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘द ऑर्गनायझर’मध्येही अजित पवार गटाला बरोबर घेतल्याने भाजपाचा पराभवा झाला, अशी टीका करण्यात आली होती. त्यानंतरच भाजपाच्या काही आमदारांमध्ये खदखद असल्याचे बोललं जात आहे.

हेही वाचा – “ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू”; रवींद्र वायकरांवरील आरोपाला CM शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “ज्या ठिकाणी…”

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेतील पराभवानंतर सातत्याने अजित पवार यांना लक्ष्य कराल, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी भाजपाला दिला आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

“संघाच्या मुखपत्रात कोणीतरी एक लेख लिहिल्यानंतर सातत्याने अजित पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात सुरू झाला आहे. भाजपाच्या एका बैठकीतसुद्धा काही नेत्यांनी भाजपाच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं आहे”, असं अमोल मिटकरी म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, “जर अशाप्रकारे अजित पवारांना जाणीवपूर्क लक्ष्य केलं जात असेल, तर आम्हाला निश्चित वेगळा विचार करावा लागेल”, अशा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.

हेही वाचा – “तुकाराम मुंढेंची बदली आता थेट अमेरिका किंवा चीनला करा”, विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर टीका!

ऑर्गनायझरमध्ये नेमकी काय टीका करण्यात आली?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे, असं त्यांनी या लेखात म्हटलं होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याची टीकाही या लेखातून करण्यात आली होती. “महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, असंही रतन शारदा यांनी म्हटलं होतं.