अजब बंगला नावाने प्रसिद्ध असलेल्या मध्य भारतातील एकमेव ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या ट्रॉफीजची परस्पर लावलेली विल्हेवाट आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (निसर्ग पर्यटन व वन्यजीव प्रशासन) यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, वन्यजीव कायद्याच्या उल्लंघनाचा हा प्रकार असल्यामुळे वनविभागाने चौकशी समिती गठीत न करता केवळ मुख्य वनसंरक्षकांना चौकशीचे आदेश दिल्यामुळे वनविभागाने या प्रकरणात अतिशय मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा संबंधित वर्तुळात आहे.
नागपुरातील अजब बंगला येथे १९९३ मध्ये वन्यप्राण्यांच्या १२९० ट्रॉफीज होत्या. मात्र, डिसेंबर १९९९ ते मार्च २००३ मध्ये १२३६ ट्रॉफीजची संग्रहालय प्रशासनाकडून विल्हेवाट लावण्यात आली. खुद्द संग्रहालयाच्या अभिरक्षकाने या कुजलेल्या ट्रॉफीज नष्ट करण्याचे आदेश दिले.
 वास्तविक, वन्यप्राण्यांच्या ट्रॉफीज नष्ट करताना वनविभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, संग्रहालय प्रशासनाने अशी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. याशिवाय, संग्रहालयाकडे या वन्यजीव ट्रॉफीजचे मालकी प्रमाणपत्र सुद्धा नाही. माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाल्यानंतर सर्वप्रथम लोकसत्ताने हे वृत्त प्रकाशित केले.
संग्रहालय प्रशासनाने केलेला हा प्रकार वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन करणारा आहे आणि संबंधितांवर या कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. वनविभागाच्या भूमिकेवरही लोकसत्ताने प्रश्न उपस्थित केला होता. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संग्रहालय प्रशासन आणि वनविभागात खळबळ उडाली.