प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिला असला तरी ते मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्या अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या सर्व घडामोडीनंतर आता बच्चू कडू यांनी अमरावतीत एल्गार मोर्चाचं आयोजन केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून त्यांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्च्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला आता मंत्रीपद मिळणार नाही, हे बच्चू कडूंच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे हा मोर्चा म्हणजे बच्चू कडू यांचं दबावतंत्र असू शकतं, असं विधान अनिल देशमुख यांन केलं. ते नागपूर येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

सत्तेत असलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीत एल्गार मोर्चा काढला आहे. सरकार बच्चू कडू यांचं ऐकत नाही, असं दिसतं का? असं प्रश्न विचारला असता अनिल देशमुख म्हणाले, “मी मागेही बोललो होतो. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार गेलेत, त्यांची अस्वस्थता आम्हाला माहीत आहे. अनेक आमदार विधानसभेत किंवा इतर ठिकाणी भेटतात, तेव्हा ते त्यांची अस्वस्थता बोलून दाखवतात. शिंदे गटातील आमदारांना वर्षभरापूर्वी आम्ही तुम्हाला मंत्री करू, असं आश्वासन दिलं होतं. पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेबरोबर गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भारतीय जनता पार्टीचे १०५ आमदार निवडून आले आहेत. पण यातील किती आमदार मंत्री झाले? तर खूप कमी आमदार मंत्री झाले. यातील १०० आमदार अतिशय अस्वस्थ आहेत. तेही आम्हाला खासगीत भेटले की सांगतात, हे काय चालू आहे, आम्हाला समजत नाही. त्यामुळे बच्चू कडूंच्या लक्षात आलं की, आपल्याला आता मंत्रीपद मिळणार नाही. त्यामुळे एल्गार मोर्चा हा बच्चू कडू यांचं दबावतंत्र असू शकतं”, असं विधान अनिल देशमुख यांनी केलं.