२०१९ साली अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार यांच्याबरोबर बोलूनच सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यावरून माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी फडणवीसांना सुनावलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं बंद करावेत, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, राष्ट्रवादी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात.”

हेही वाचा : २०२४मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीत? देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

“नंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण, शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली,” असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.

“पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती,” असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीची जागा कोण लढवणार? देवेंद्र फडणवीसांनी चर्चाच संपवली; म्हणाले, “ती जागा…!”

“जनसामान्यांच्या अडीअडचणीकडं लक्ष द्यायला हवं”

फडणवीसांनी केलेल्या दाव्याबद्दल अनिल देशमुखांना प्रसारमाध्यमांनी विचारलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप बंद करावेत. जनसामान्यांच्या अडीअडचणीकडं लक्ष द्यायला हवं. जुन्या गोष्टी काढून गौप्यस्फोट करत बसायचं. पण, पेरणीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांकडे बियाणे आणि खते घेण्यास पैसे नाहीत. अशावेळी सरकारने याकडं लक्ष देऊन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे.”