एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी एक दावा करुन खळबळ उडवली. बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी तसाच ठेवला होता. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचे ठसे घेतले असा आरोप रामदास कदम यांनी केला. त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिलं आहे.

रामदास कदम यांचे आरोप अनिल परब यांनी खोडले

रामदास कदम यांनी केलेले आरोप खोडून काढताना अनिल परब म्हणाले, त्यांनी केलेले आरोप शंभर टक्के खोटे आहेत. मला एक गोष्ट सांगा की, बाळासाहेब यांना भेटायला असंख्य गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात कुठली बॉडी दोन दिवसांसाठी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटी शिवाय ठेवता येऊ शकतो का? याबाबत रामदास कदमांची अक्कल गुडघ्यात आहे. त्यांना जे काय कुणी सांगितलं आहे, त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता. कुठलाही मृतदेह दोन दिवस शवघराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठली इंजेक्शन दिली काही जरी केलं तरी असं करता येत का? बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस ठेवला गेला हा धादांत खोटा आरोप आहे. असं अनिल परब म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंचे मोल्ड ते हयातीत तयार झाले होते-अनिल परब

रामदास कदम जे म्हणतात ना तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते. हे मोल्ड कुठे ठेवले ते माहित आहे, आपल्याला माहीत असेल अंधेरीला स्टेडियम झालं, अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेअर्स त्या वेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते, बाळासाहेबांच्या नंतर हे मोल्ड जे ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्याच्या पाठीमागे ठेवले, हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले होते, असंही परब यांनी म्हटलं आहे.

कुठल्या डॉक्टरांनी रामदास कदम यांना सांगितलं?

अनिल परब म्हणाले, तिथे तेव्हा उपस्थित होते त्यांच्यापैकी शरद पवार आहेत ना..ते त्याचे उत्तर देऊ शकतात ना…मिलिंद नार्वेकरही आहेत. कोण डॅाक्टर आहे. ज्यांनी खोटी माहिती पसरवली त्यांना समोर आणा. पक्ष घेतला, माणसे घेतली पण तरीही काही होत नसल्याने आता बाळासाहेबांच्या मृत्यूचे राजकारण करत आहेत. तेव्हा असा एक प्रस्ताव आला की अँब्युलन्सद्वारे मृतदेह नेवून पार्कात दर्शनासाठी ठेवायचा. पण नंतर निर्णय बदलून अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय झाला, असंही पुढे अनिल परब यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कायदेशीर बाबीचा अभ्यास करून मृत्यू पत्र बनवलं होतं, रामदास कदम आता १७ वर्षांनंतर शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. महापलिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामुळं वातावरण तयार करत आहेत, जे मूळ प्रश्न आहेत ते भरकटवत आहेत, सकाळी ६ वाजता शिवाजी पार्कवर अँब्युलन्समध्ये बाळासाहेब यांचे पार्थिव घेऊन जाऊ असा प्रस्ताव होता पण गर्दी खूप होणार होती म्हणून मग तो प्रस्ताव मागे घेतला. जयदेव ठाकरे कोर्टात आले होते.. नंतर काय झालं तुम्हाला माहीत आहे असंही अनिल परब म्हणाले.