Anil Parab बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू प्रकरणात रामदास कदम यांनी जे आरोप उद्धव ठाकरेंवर केले त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आक्रमक झाला आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. रामदास कदम यांनी नीचपणा केला आहे असं अनिल परब म्हणाले.
काय म्हणाले अनिल परब?
“रामदास कदम यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केला आहे. याला नीच हाच एक शब्द लागू होतो. या आरोपांचं उत्तर देण्याची गरज आम्हाला वाटत नव्हती. कारण पोरीबाळी नाचवून आणि त्यांची दलाली खाऊन बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही. पण आमच्या दैवताच्या म्हणजेच बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे मी उत्तर देतो.” असं अनिल परब म्हणाले आणि त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर दिलं.
रामदास कदम यांच्या आरोपांना काय उत्तर?
बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी २४ तास तिथे होतो. त्यामुळे सगळ्या घटनांचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला जी घटना घडली ती पाहिली आहे. रामदास कदम यांना बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर जवळपास १५ वर्षांनी कंठ फुटला आहे. २०१४ ला रामदास कदम मंत्री झाले. त्यांना मंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर मग त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? २०१९ ला मुलाला आमदारकी घेतली. उद्धव ठाकरेंकडून सगळं मिळत होतं तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. जर ते स्वतःला स्वाभिमानी समजतात तर रामदास कदम यांनी तेव्हाच पक्ष सोडायला हवा होता. २०१२ मध्ये रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते तो बाकडा मी शोधतो आहे. बाळासाहेब ठाकरे ज्या खोलीत होते, त्यावेळी २४ तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं. प्रत्येक मिनिटाला मॉनिटरिंग सुरु होतं. असंख्य लोक भेटायला येत होते. सगळ्यांना माहीत होतं की बाळासाहेब ठाकरे जिवंत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं राजकारण करायचं आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नांपासून बाजूला न्यायचं असले प्रकार चालले आहेत.
रामदास कदम यांच्या बायकोने जाळून का घेतलं? याचीही नार्को चाचणी झाली पाहिजे-परब
१९९३ मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं की जाळलं? हे देखील नार्को टेस्टमध्ये आलं पाहिजे. कुणाला बंगले बांधून दिले, त्याचे तपशीलही आले पाहिजेत. योगेश कदम हा आता गृहराज्यमंत्री आहे. आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे. बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र काय आहे ते मला माहीत आहे. त्यातला तपशील मला ठाऊक आहे. ते करुन घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय त्यावर कुणाच्या सह्या आहेत, कुणाचे ठसे आहेत हे मला माहीत आहे. मेलेल्या माणसाच्या हाताचे ठसे घेतले तरीही काही उपयोग होत नाही. हे मी तुम्हाला सांगतो आहे. रामदास कदम यांचं ज्ञान कच्चंं आहे. उद्धव ठाकरेंबाबत जनतेच्या मनात विष कालवायचं म्हणून हे आरोप करण्यात आले आहेत असंही अनिल परब म्हणाले.