Anjali Damania on Nitin Gadkari Son Cian Agro Share : नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी यांची सियान अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या समभागांची (शेअर्स) किंमत दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अवघ्या दिड महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत जवळपास चौपट झाली आहे. दरम्यान, या कंपनीच्या शेअर्सची किंमत, प्रवर्तकांकडे असलेले एकूण शेअर्स याबाबतचं गणित मांडून समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांना चिमटा काढला आहे.

“माझ्या बुद्धीचं मूल्य प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये इतकं आहे”, असं वक्तव्य गडकरी यांनी अलीकडेच केलं होतं. त्याच वक्तव्याचा दाखला देत दमानिया म्हणाल्या की “गडकरी स्वतःला खूप कमी लेखतायत. त्यांचा मुलगा तर दिवसाला १४४ कोटी रुपये कमावतोय.” यासंदर्भात त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

अंजली दमानियांचा गडकरींना चिमटा

अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखलं आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज १४४ कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.

दमानिया यांनी मांडलं गणित

“आपल्याला माहिती आहे की त्यांच्या मुलाची सियान अ‍ॅग्रो नावाची कंपनी आहे. २५ जून रोजी सियान अ‍ॅग्रोमध्ये १,८९,३८,१२१ प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते. या शेअरच्या किमतीत आज ७६ रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच एका दिवसात १४३.९२ कोटी रुपये त्यांनी कमावले. निखील व सारंग गडकरी दिवसाला इतके पैसे कमावत आहेत.”

गडकरी काय म्हणाले होते?

इथेनॉल ब्लेंड फ्यूलची (ई-२० पेट्रोल) बरीच चर्चा होत आहे. सरकारने आता सर्वच पेट्रोल पंपांवर इथेनॉल मिसळलेलं पेट्रोल विकणं अनिवार्य केलं आहे. सरकारच्या या निर्णयावर लोक शंका घेत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका होत आहे. यावर गडकरी म्हणाले, “माझ्या बुद्धीचं मूल्य प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये आहे. पैशांसाठी मी इतक्या खालच्या स्तरावर जाऊ शकत नाही.”