Parth Pawar Pune Land Stamp Duty Scam Case : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन घोटाळ्याच्या संदर्भात विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अंबादास दानवे यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

यानंतर या जमीन खरेदी प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘अधिकाऱ्यावर नाही तर हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा’, असं थेट आव्हान अंजली दमानिया यांनी सरकारला केलं आहे.

अंजली दमानिया यांनी काय म्हटलं?

“पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन पहिली कारवाई, फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा”, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानिया यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये काय म्हटलं?

अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर या प्रकरणासंदर्भात काही पोस्ट केल्या आहेत. “शेतकऱ्यांना सारखं फुकट, सारखं माफ लागतं म्हणणारे अजित पवार..पण पोराच्या १८०४ कोटींचे डील. त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्युटी होते. पण हे डील ३०० कोटीचे दाखवून त्यावरचे २१ कोटी देखील माफ! ही माफी फुकट नव्हती का?” असा थेट सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.

तहसिलदारांचे निलंबन करण्याचे आदेश

पार्थ पवार यांच्यावर पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकरांचा भूखंडाच्या प्रकरणात राजकीय आरोपांची राळ उठली. विरोधकांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असं सांगितलं होतं. यानंतर आता एका तहसिलदारांचं निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलं?

पुण्यातील जमीन व्यवहाराबाबत पार्थ पवार यांच्यावर आरोप होताच माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली. यावर नागपूर येथे बोलत असताना ते म्हणाले, “सदर प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड्स याची सर्व माहिती मागितली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहेत. सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी जे सांगायचे ते सांगेन.”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे. त्यादृष्टीने आज माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई काय आहे, त्याबाबत दिशा स्पष्ट करू. उपमुख्यमंत्रीही (अजित पवार) अशा कुठल्याही प्रकाराला पाठिशी घालतील असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. अनियमितता झाली आहे का? हे पडताळून पाहिले पाहिजे. अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.