लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : काही दिवसापूर्वी रायगड जिल्हा परिषदेतील दोन सहाय्यक अभियंत्यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. आता जिल्हा परिषदेतील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. पनवेल तालक्यातील काही कामांची दोन बिलं काढून लाखो रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

पनवेल तालुक्यातील ६ ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून मंजूर करण्यात आलेला कामांची परस्पर खोटी बिले काढल्याची तक्रार जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम कंत्राटदार संघटना पनवेल अध्यक्ष नीलेश म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) सत्यजित बडे यांनी घेतली असून, याप्रकरणी चौकशी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

आणखी वाचा-‘जीएसटीमधून शेतकऱ्यांची सुटका करणार’, भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधींचं आश्वासन

पनवेल तालुक्यातील उसर्ली, नेरेपाडा, शिवकर, खेरवाडी, कोळघे या ग्रामपंचायत रस्त्यांची तर पालीदेवद ग्रामपंचायतीत संरक्षण भिंत बांधण्याचे काम जिल्हा परिषदेच्या स्व निधीतून मंजूर करण्यात आले होते. या कामांची परस्पर खोटी बिले काढण्यात आल्याची तक्रार नीलेश म्हात्रे यांनी दिली होती.

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी वेळ न दवडता या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश बांधकाम विभागाला १२ मार्च रोजी दिले आहेत. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास पोलीस स्थानकात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्याजित बडे यांनी चौकशीचे आदेश देताच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसन्नजीत राऊत यांनी वरील कामांची व अदा करण्यात आलेल्या बिलांची चौकशी हाती घेतली आहे.

आणखी वाचा-बसस्थानक स्वच्छ, सुंदर करण्यासाठी शासनाची ‘ही’ आहे योजना, जाणून घ्या सविस्तर…

दरम्यान आधी लाचखोरीच्या प्रकरणामुळे आणि आता खोटी बिले काढल्याच्या तक्रारींमुळे रायगड जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. अलिबाग तालुक्यातही असाच बिल घोटाळा झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर केले जात आहेत. पण पनवेल मधील प्रकरण चव्हाट्यावर आल्याने अलिबाग मधील प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल तालुक्यातील काही कामांची दोन बिले काढण्यात आल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” -सत्यजीत बडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप