सातारा : सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली. त्यास तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण आणि हवालदार उमेश दत्तात्रय गहीण (पोलीस वसाहत, वाई )अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
तक्रारदारांकडे वाई पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. पडताळणीत हवालदार गहीण यांनी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या करिता पंचासमक्ष रुपये २० हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार अंमलदार कक्षात स्वीकारली. तत्पूर्वी उपनिरीक्षक चव्हाण यांनी तक्रारदारांना दमदाटी करून, अटक करण्याची भीती दाखवली. त्यामुळे त्यांनी लाचेची मागणी मान्य केली. या प्रकरणात गहीण यास अटक करण्यात आली. त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेण्यास प्रोत्साहन दिले म्हणून पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली. ही कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक राजेश वाघमारे, हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, नीलेश राजपुरे यांनी केली.
धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक
धोम (ता.वाई) येथील नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे सहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. सचिन आनंदा नवघणे (रा. टिटेघर, ता. भोर) असे संशयिताचे नाव आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.
धोम येथील चोरीप्रकरणी निरंजन पवार यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंद करून पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सचिन नवघणे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून नवनाथ दत्त मंदिरातील चोरी केलेली रोख रक्कम सहा हजार रुपये ताब्यात घेतली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार अजित जाधव, कॉन्स्टेबल श्रावण राठोड, हेमंत शिंदे, नितीन कदम, विशाल शिंदे, राम कोळी, अजित टिके यांच्या पथकाने केली.