ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, २०२०-२१ मध्ये भारत सरकारने शेतकरी आंदोलनाच्या बातम्या देणाऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाई करण्याची अनेक वेळा दबाब टाकला होता. त्यांची ही मुलाखत ट्विटरवर व्हायरल झाली आहे. त्यात डॉर्सी यांनी दावा केला आहे की, जे पत्रकार त्यावेळी शेतकरी आंदोलनावरील सरकारच्या भूमिकेवर टीका करत होते. त्यांच्या ट्विटर खात्यांवर कारवाई करावी, अन्यथा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापेमारी करू, असं केंद्र सरकारने ट्विटरला धमकावलं होतं. जॅक डोर्सी यांच्या आरोपांवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतात जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक विदेशी शक्ती जाग्या होतात, अशी टीका अनुराग ठाकूर यांनी केली आहे. ‘एएनआय’ला प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकूर म्हणाले, “अनेक वर्षांच्या झोपेतून जॅक डोर्सी जागे झाले आहेत. ते आपल्या काळ्या कृत्यांवर पांघरुण टाकत आहेत. एका दुसऱ्या व्यक्तीकडून जेव्हा ट्विटरला खरेदी केलं, तेव्हा या प्लॅटफॉर्मचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जात होता? याचा ‘ट्विटर फाइल्स’मधून खुलासा झाला. असं मी म्हणत नाहीये, ‘ट्विटर फाइल्स’मध्ये म्हटलं आहे. यावर जॅक डोर्सी आजपर्यंत काहीही उत्तर देऊ शकले नाहीत. कारण त्यांचा पर्दाफाश झाला आहे.”

हेही वाचा- “शेतकरी आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने धमकावलं”, ट्विटरच्या माजी सीईओच्या आरोपांवर सरकारचं उत्तर, म्हणाले…

अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, “भारतात जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक विदेशी शक्ती जाग्या होतात. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात काही ना काही विघ्न निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्याकडून खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा घटनांचा आधीही पर्दाफाश झाला आहे, आताही पर्दाफाश होईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भारताची लोकशाही अत्यंत मजबूत आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, विदेशातील शक्ती असो वा त्यांचे भारतात बसलेले एजंट असो, यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते या देशाला अस्थिर करू शकणार नाहीत,” असंही ठाकूर म्हणाले.