आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचे आवाहन
बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर तिचे वडील लहू चव्हाण हे माध्यमांपुढे प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आले आहेत. पूजासह आमच्या चव्हाण कुटुंबीयांची समाजात होणारी बदनामी थांबवावी, असे आवाहन त्यांनी माध्यमांसमोर केले आहे.
परळी येथील पूजा लहू चव्हाण या तरुणीने पुणे येथे आत्महत्या केल्याची घटना मागील आठवड्यात उघडकीस आली होती. एका मंत्र्यासोबत कार्यकत्र्याचे झालेले संभाषण समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. सध्या या प्रकरणावरून भाजपने सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली आहे. बंजारा समाजातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पूजाच्या आत्महत्येनंतर परळीतील तिचे कुटुंबीय माध्यमांपासून दूर होते. परळीच्या नेहरू चौक परिसरातील त्यांचे घरही बंद होते. या प्रकरणात तिचे वडील लहू चव्हाण रविवारी प्रथमच माध्यमांसमोर आले. मला सहा मुली आहेत, त्यापैकी चौघींची लग्नं झाली असून पूजा व तिची लहान बहीण अविवाहित होत्या. पूजा मुलगी नव्हे तर माझ्यासाठी मुलगा होता. तिने स्वत:च्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून कुक्कुटपालन सुरू केले होते. मात्र आधी करोना व नंतर बर्ड फ्ल्यूमुळे मोठे नुकसान झाल्याने ती चिंतेत होती. आजारीही होती. दोन महिन्यांपूर्वीच पूजा पुण्याला गेली होती. मी तिला यासाठी २५ हजार रुपये दिले होते. ६ फेब्रुवारी रोजी पूजाशी बोलणे झाले. मात्र दुपारी १ वाजता ती व्हरांड्यातून पडली असून तातडीने या असा निरोप तिच्यासोबत राहणाऱ्या मुलाने दिला. ती कशी पडली, याबाबत माहिती नाही. ती आजारी होती का, तिला चक्कर आली का? याविषयी मी काहीच सांगू शकत नाही. मात्र पूजाच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे माध्यमातून चर्चा केली जात आहे, तिच्याविषयी उलटसुटल बोलले जात आहे, त्यामुळे समाजात आमची बदनामी सुरू आहे. माझी कोणाबाबतही तक्रार नाही. राजकारणी मंडळींनी आमची बदनामी थांबवावी असे आवाहन करताना लहू चव्हाण यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पूजा आत्महत्या प्रकरणाला पूर्णविराम मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.