सावंतवाडी : अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याच्या हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे मच्छिमारांनी तातडीने खबरदारी घेतली असून, शेकडो मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यात स्थानिक नौकांबरोबरच गुजरात राज्यातील नौकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २८ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्रात वातावरण अस्थिर राहणार असल्याने मच्छिमारांना या काळात समुद्रात न जाण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. परिणामी, खोल समुद्रात गेलेल्या शेकडो नौकांनी तातडीने देवगड बंदरात परत येऊन नांगर टाकला आहे.
बंदरात गजबज, बाजारात मासळीचे दर वाढले
एकाच वेळी स्थानिक तसेच गुजरात राज्यातील मोठ्या संख्येने नौका देवगड बंदरात दाखल झाल्यामुळे बंदर परिसरात मोठी गजबज निर्माण झाली आहे.
दरम्यान, अलीकडच्या काळात मच्छिमारांना बांगडा, तोवर, पेडवे आणि गेजर यांसारख्या मासळ्यांचा चांगला भर मिळत होता. परंतु, हवामानातील या अनिश्चिततेमुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. मासेमारी बंद झाल्याचा थेट परिणाम बाजारावर झाला असून, मासळीची आवक घटल्याने बाजारात मासळीचे दर झपाट्याने वाढले आहेत.
समुद्रातील ही वादळसदृश स्थिती मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम करत असून, मच्छिमार हवामान सामान्य होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
