सातारा : बेकायदा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची विक्री करणाऱ्या राष्ट्रीय मल्लाला अटक केल्यानंतर यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले. सातारा शहर पोलिसांनी मुंबईतून मुख्य सूत्रधाराला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. तय्यब हाफीस खान (मालाड, मुंबई) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.
सातारा शहर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय मल्ल शिवराज कणसे (शाहूनगर, सातारा) याला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर पोलिसांना ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ विक्री करणाऱ्यांची नावे समोर आली. यानंतर पोलिसांनी एका शिकाऊ डॉक्टरसह तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीतून मुख्य आरोपीचे नाव पोलिसांनी निष्पन्न केले. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोमवारी मुंबईला रवाना झाले होते. पोलिसांनी मालाड येथून तय्यब खान याला अटक करून साताऱ्यात आणले. रात्री उशिरा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तय्यब खान हा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची विक्री साताऱ्यातील खेळाडूंना करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची व्याप्ती वाढत असल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
साताऱ्यात कॅफेंवर छापे; नऊ जणांविरुद्ध गुन्हे
सातारा शहर पोलिसांनी ठिकठिकाणच्या तीन कॅफेंवर अवैध कृत्यांबद्दल शुक्रवारी छापे टाकण्यात आले. यामध्ये ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राधिका रस्त्यावरील एक, सिटी बिझनेस सेंटर येथील एक आणि तिसरी कारवाई साईबाबा मंदिरासमोरील कॅफेवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.