सातारा: येथील ज्येष्ठ कर सल्लागार, लेखक, चित्रपट निर्माते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण रामकृष्ण गोडबोले (वय ८२) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे बंधू अशोक व डॉ. अच्युत, पत्नी अनुपमा, मुलगा उदयन, सून संजीवनी, मुलगी डॉ. गौरी ताम्हणकर, जावई डॉ. हेमंत ताम्हणकर, पुतणे प्रद्युम्न व डॉ. चैतन्य, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

गोडबोले हे गेले अनेक दिवस आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. कर सल्लागार म्हणून गोडबोले यांनी आपली कारकीर्द सुरू केली. या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांनी साताऱ्यासोबतच दक्षिण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली. अर्थ विषयासोबतच साहित्य, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा विषयांमध्येही त्यांना विशेष रूची असल्याने सुरुवातीपासूनच ते या क्षेत्रातील विविध संस्था, उपक्रमांशी जोडलेले होते. या उपक्रमांमध्ये त्यांनी कामातून आपला ठसा उमटवला होता. सातारा शहरातील विविध सार्वजनिक – सांस्कृतिक कार्यातील अध्वर्यू म्हणून गोडबोले ओळखले जात होते.

येथील दि युनायटेड वेस्टर्न बँक, अर्कशाळा, सज्जनगडचे समर्थ सेवा मंडळ, अंत्यसंस्कार सहायक मंडळ, कुरणेश्वर (खिंडीतील) गणपती देवस्थान ट्रस्ट अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी विविध पदांची जबाबदारी पार पाडली. ‘कौशिक चित्र’ या नावाखाली त्यांनी पाच मराठी आणि एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. यातील ‘नशीबवान’ हा मराठी चित्रपट गाजला होता. याशिवाय अनेक कलाकारांच्या ध्वनिमुद्रिकाही त्यांनी प्रकाशित केल्या. एक लेखक म्हणूनही ते ओळखले जात. कविता, प्रवासवर्णन, ललित, संत साहित्य अशा विविध साहित्य प्रकारात त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अर्थ विषयावरही त्यांनी लेखन केले. यामध्ये मृत्युपत्राची गरज आणि युनायटेड वेस्टर्न बँक ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. त्यांनी सुरू केलेल्या कौशिक प्रकाशन संस्थेमार्फतही त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. सातारा शहर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींशी त्यांचा निकटचा संबंध होता.

ते कार्यरत असलेल्या रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे साताऱ्याच्या भूमीतील मान्यवरांचा साताराभूषण पुरस्कार देत गौरव केला जाई. दरवर्षी या ट्रस्टच्या माध्यमातून ते शेकडो शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाई. गोडबोले गेले अनेक दिवस आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. त्यांच्यावर बुधवारी सकाळी संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.