सांगली : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला कृष्णाकाठचा विरोध आहे. पण सांगली, कोल्हापूरची पूरस्थिती टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबतचे सूत्र उभय राज्यांच्या जलसंपदा विभागाने निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आल्याचे अलमट्टी उंचीवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष आ. अरूण लाड यांनी सांगितले. आ. लाड यांनी सांगितले की शेतकरी, पुरबाधित नागरिक आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या माध्यमातून अंकली टोलनाका येथे चक्काजाम आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी चर्चा केली.
सदर बैठकीत अभ्यासपूर्वक मांडणी करून महापुरास अलमट्टी धरण व त्याची प्रास्तावित उंचीवाढ ही कशाप्रकारे कारणीभूत ठरणार आहे, याची मांडणी केली. जलसंपदा विभागाचे मुख्य सचिवांना या सर्व बाबींचा अभ्यास करण्याची सूचना व येत्या १५ दिवसांमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आगामी बैठकीतून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन उपस्थित सर्वपक्षीय संघर्ष समितीला देण्यात आले.
पावसाळ्यामध्ये अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कसा असावा, याचे सूत्र केंद्र शासनाने कर्नाटक सरकारला घालून देणे गरजेचे आहे. बॅकवॉटरच्या पाण्याचा प्रभाव वाढल्यानंतर पावसाचे प्रमाण, धरणात पाण्याची आवक याचा विचार करून तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाकडून समन्वय साधून अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचे सूत्र ठरवावे, जेणेकरून कर्नाटक व महाराष्ट्रातील नदीकाठच्या जनतेला महापुराचा फटका बसणार नाही, अशीही मागणी यावेळी करण्यात आल्याचे आ. लाड यांनी सांगितले.