scorecardresearch

“ज्यांच्या पक्षाचा जन्मच..,” भाजपा इतर पक्षांना संपवतो या शरद पवारांच्या आरोपावर आशिष शेलारांचा पलटवार

भाजपाकडून प्रादेशिक तसेच इतर पक्षांना संपवण्याचे काम केले जाते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

“ज्यांच्या पक्षाचा जन्मच..,” भाजपा इतर पक्षांना संपवतो या शरद पवारांच्या आरोपावर आशिष शेलारांचा पलटवार
शरद पवार आणि आशिष शेलार (संग्रहित फोटो)

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर भाजपाकडून प्रादेशिक तसेच इतर पक्षांना संपवण्याचे काम केले जाते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवारांच्या याच आरोपाला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. ज्यांच्या पक्षाचा जन्मच दुसऱ्या पक्षाला फोडून झालेला असेल, त्यांना भाजपाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शेलार म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> “भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, कारण…”, शरद पवारांचा गंभीर आरोप

“शरद पवार खूप मोठे नेते आहेत. त्यांना जुन्या गोष्टींची आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्या पक्षाचा जन्मच दुसऱ्या पक्षांना फोडून झाला, त्यांना दुसऱ्या पक्षांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर टीका केली. नेतृत्वाला संपवण्याचे काम केले. त्यांनी भाजपाने कसे वागले पाहिजे, याचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही,” असा पलटवार आशिष शेलार यांनी केला.

हेही वाचा >>> Maharashtra Cabinet: बच्चू कडू यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले “नाराजी आहेच, त्यांनी शपथ घेऊन…”

एकनाथ शिंदे दुसरी भूमिका मांडत असतील तसेच त्यांनी वेगळा पक्ष काढावा. एखाद्या पक्षाच्या चिन्हावर दावा करू नये किंवा ते गोठवू नये, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. यावरदेखील आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. “त्यांनी आपले मत जरूर मांडावे. मात्र राष्ट्रवादी हा निवडणूक आगोय नाही. विचाराने, आचाराने आणि संविधानाने आम्ही शिवसेना पक्ष चालवत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणाऱ्यांनाच धनुष्यबाण चिन्ह मिळाले पाहिजे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. शिंदे यांची भूमिका आम्हाला मान्य आहे,” असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.