सोलापूर जिल्ह्यात बार्शीमध्ये वाळू तस्करीविरोधात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आकाश दळवी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. यात आकाश दळवी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे हात व पाय मोडले असून डोक्यालाही जबर मार लागला आहे. याशिवाय त्यांचे सहकारी प्रवीण भोसले व रामराजे चोरघडे यांच्या हात, पाय व तोंडाला मार लागला. ते खांडवी येथील पोर ओढ्यात होणारी वाळू तस्करी रोखण्यासाठी गेले असताना वाळू तस्करांनी त्यांच्यावर हल्ला केला. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बार्शी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता आणि अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश दळवी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं, “मी खांडवी ग्रामपंचयातमध्ये सदस्य आहे. मी बार्शी तालुक्यातील पर्यावरण संरक्षणाच्या निमित्ताने वाळु चोरी, वृक्ष तोड, गौण खनिज अवैध उत्खनन याबाबत शासनाच्या विविध कार्यालयात तक्रारी दिलेल्या आहेत. आमच्या गावातील घोर ओढ्यातील वाळू चोरुन उत्खनन होत असल्याबाबतही मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरिक्षक, मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, राज्याचे महसुल सचिव व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच गुन्हेगारांवर कारवाई न झाल्यास राष्ट्रीय हरीत लवाद येथे तक्रार दाखल करण्याबाबत वकिलांची नोटीस पाठवली.”
“खांडवीतील ओढ्यातून अवैध वाळू उपसा”
“मला काही दिवसांपूर्वी भौजे खांडवी येथील पोर ओढा येथे चोरून अवैध वाळू उपसा होत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावेळी मी तेथे गेलो. परंतु मला तेथे वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले नाही. १८ जूनला ग्रामपंचायत सदस्य सचिन घोरपडे यांनी त्यांना समाधान बालाजी बरडेने फोनवरून धमकी दिल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही बार्शी शहर पोलीस स्टेशनला सचिन चोरघडे विरुद्ध तक्रार दिली,” अशी माहिती आकाश दळवी यांनी दिली.
“वाळू तस्करी करणारा जेसीबी अडवला असता जीवे मारण्याचा प्रयत्न”
आकाश दळवी पुढे म्हणाले, “१९ जूनला मी, प्रवीण वाल्मिकी भोसले व रामराजे कुंडलिक चोरघडे असे आम्ही रात्री दोन वाजता खांडवी येथील पोर ओढ्यात पाहणीसाठी गेलो. तेथे जे.सी.बी., ट्रॅक्टर, ट्रॉलीचा वापर करून ओढ्यातून वाळू उपसा सुरू असल्याचे आम्हाला दिसले. यानंतर मी लगेच मोबाईलद्वारे फेसबूक लाईव्ह केलं आणि ही घटना कॅमेरात कैद केली. मी फेसबुक लाईव्ह करत असताना जे.सी.बी चालक, ट्रॅक्टर चालक आपआपली वाहने घेऊन पळून जाऊ लागले. मी जे.सी.बीवर चढून चालकाला जे.सी.बी थांबण्यास सांगितले. परंतु मी जेसीबीवर असतानाच तो जेसीबी घेऊन पळू लागला. मी त्याला त्याचे नाव विचारले. मात्र, चालकाने त्याचे नाव सांगितले नाही. थोड्या अंतरावर गेल्यानंतर जेसीबी चालकाने गाडीचा वेग कमी करून मला खाली ढकलून दिले. त्यामुळे मी खाली जमिनीवर पडलो.”
व्हिडीओ पाहा :
“घराकडे जात असताना रस्त्यात अडवलं”
“यानंतर मी, प्रवीण भोसले, रामराजे चोरघडे असे परत घोर ओढा येथे परत आलो. माझी गाडी घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी गावाकडे जात होतो. त्यावेळी ओढ्याच्याबाहेर करडे ते खांडदी रोडवर समोरून दोन मोटार सायकलवरुन समाधान बालाजी बरडे, बप्पा शिवाजी कदम, कौशिक हिंमत पाटील, आशुतोष बजरंग गव्हाणे, संदिप जाधव हे समोर आले. त्यावेळी समाधान बरडे व बप्पा शिवाजी कदम याच्या हातात लोखंडी चौकोनी पाईप होते. कौशिक पाटील व आशुतोष गव्हाणे यांचे हातात काठ्या होत्या,” असं त्यांनी सांगितलं.
“लोखंडी पाईप व काठ्यांनी मारहाण”
मारहाणीच्या घटनेची माहिती देताना आकाश दळवी म्हणाले, “त्या सर्वांनी मला ‘तू आमच्याविरोधात तक्रारी करतो का, तू आमच्या विरोधात उभा राहतो का, तुझी लायकी आहे काय, जातीचा उल्लेख करून तुझा जीवच घेतो अशी धमकी दिली. तसेच त्यांनी हातातील लोखंडी पाईपने व काठ्यांनी मला, प्रवीण भोसले, रामराजे चोरघडे यांना मारहाण केली. मी त्यांना मारू नका, माझ्या जातीवरुन बोलू नका असे म्हणालो. त्यावर त्यांनी मला आणखी मारहाण करत तू आता गावात राहायचे नाही म्हटलं.”

“जीवे मारून टाकण्याची धमकी”
“आम्हाला मारहाण सुरू असताना घोरओढ्याकडून दयानंद हणमंत देसाई (रा. दडशिंगे, ता. बार्शी) तेथे आला. त्यानेही आम्हाला आमची शुटींग करतो का असे म्हणून लोखंडी पाईपने डोके, हात व पायावर मारहाण केली आणि जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. आशुतोष गव्हाणेने माझा मोबाईल घेऊन त्यातील व्हिडीओ डिलीट करतो असं म्हटलं. त्यांच्या मारहाणीत माझ्या गळ्यातील साडेनऊ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तुटून गहाळ झाली,” अशी माहिती आकाश दळवी यांनी दिली.
“मारहाणीत माझे दोन्ही हात व दोन्ही पाय मोडले”
“मला मारहाण केल्यानंतर कौशिक पाटीलने समाधान बरडेला ‘गणुसाहेबांना’ फोन लाव असे सांगितले. समाधान बरडेने फोन करून तोंडातून फेस आल्याचं आणि काम झाल्याचं सांगितलं आणि ते निघून गेले. यानंतर मी ११२ व सोलापूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी आम्हाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीत माझे दोन्ही हात व दोन्ही पाय मोडले. प्रवीण भोसले व रामराजे चोरघडे यांनाही या मारहाणीत हात, पाय व तोंडाला मार लागला. आरोपींनी आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी माझा विवो कंपनीचा मोबाईलही घेतला,” असा आरोप आकाश दळवी यांनी केला.