लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : दादा-बापू हा चाळीस वर्षापुर्वीचा जुना वाद उकरून काढून काही लोक समाज माध्यमातून टीकाटिपणी करून पेटविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इतिहासातील घटनांचा विचार करून भविष्यातील कल्पनांना मूठमाती देऊ नये या मताचा मी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी आपण प्रयत्न केले असल्याचा आरोप होत आहे याबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले, माझा चर्चेच्या पातळीवर सहभाग होता. मात्र, चर्चेत गुणवत्तेवर आधारीत जागा वाटपाचा मुद्दा आलेला नव्हता. हा वाद ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील असल्याने आपला सहभाग नव्हता. मात्र चर्चेच्या प्रत्येक टप्प्यावर होणार्या घटनांची माहिती संबंधितांना देत आलो आहे. आताही एकास एक लढत व्हावी यासाठी मी प्रयत्नशील असून चर्चेची तयारीही आहे. सन्मानजनक तोडगा निघावा आणि भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वानी एकत्र यावे असे आपले प्रयत्न राहतील. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून पैलवान पाटील यांचाच प्रचार आम्हाला करावा लागेल असे सध्या तरी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेईपर्यंत काहीही घडू शकते असेही ते म्हणाले.
आणखी वाचा-उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल स्थिती असून लोक मतदानाची वाट पाहात आहेत. ४८ पैकी ३२ जागा मविआला मिळतील, तर ८ ते १० जागांवर मोठी चुरस असल्याचे आमदार पाटील म्हणाले. भ्रष्टाचारी मंडळींना घेउन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणार्यांना जनता यावेळी पराभूत करण्याच्या मानसिकतेत असल्याचेही त्यांनी सांगितले.