औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पण त्यांनतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत त्यांनी पुन्हा हा प्रस्ताव मंजूर केला.

या प्रस्तावाला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी विरोध केला. तसेच त्यांनी औरंगाबाद शहरात आंदोलन आणि मोर्चेदेखील काढले. यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आधी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग शहराला औरंगाबाद म्हणा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून राजकीय वातावरण तापत असताना, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

औरंगाबादमध्ये अनेक लोकांचं नाव औरंगजेब असून रावसाहेब दानवे यांचा दावा खोटा असल्याचंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, “औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- “आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…” रावसाहेब दानवे यांची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका!

“महाराष्ट्रात औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद या तीन शहरांच्या नावात मुस्लीम नाव आहे. ही तीन नावं बदलल्याने जर महाराष्ट्रातील जनतेला नोकरी मिळणार असेल, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, विकास होणार असेल तर मी नामकरणाचं स्वागत करेन” असंही आझमी म्हणाले.