रत्नागिरी : गेले दोन दिवस मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले असून पावसाने यंदाच्या मोसमात सरासरी दोन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे.

यंदाच्या मोसमात जून महिन्यात पावसाचा जोर विशेष नव्हता. पण जुलै महिन्याच्या पूर्वार्धात त्याने ही कसर भरून काढली. विशेषत: ४ ते ७ जुलै या काळात यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस होऊन एक हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. त्यानंतरही काही दिवस चांगला पाऊस झाला. पण जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात पुन्हा त्याचा जोर ओसरला एवढेच नव्हे तर कडक उन्हामुळे भातपिकावर रोग पडण्याचा धोका निर्माण झाला. पण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने यंदाच्या मोसमातील दोन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडणे शक्य झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्याची दीर्घकालीन वार्षिक सरासरी ३३६४ मिलीमीटर आहे. त्यापैकी गेल्या १ जूनपासून आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी २ हजार १३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वार्षिक सरासरी सहज ओलांडली जाईल, अशी चिन्हे आहेत.

दरम्यान गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी गाठली आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापनासह नगर परिषद नियंत्रण कक्ष सज्ज केला आहे. धोकादायक बनलेल्या परशुराम घाटातील वाहतूक दिवसा चालू ठेवली आहे.

गुहागर तालुक्यातील नद्यांनी पात्र सोडून वाहायला सुरुवात केली. आरे येथे किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी शिरले. तेथील लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. कोतळूक कासारी नदीला प्रथमच आलेल्या पुरामुळे भातशेती पाण्याखाली गेली. तसेच पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली.

आरे, असगोली पुलावर पाणी वाहत पाणी आहे.

दापोली पालगड येथे रुक्मिणी कदम यांच्या घराजवळ दगड, माती कोसळून घर आणि गोठय़ाचे नुकसान झाले. साखरी त्रिशूळ येथे दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली. संगमेश्वर तालुक्यातील कासे-पुर्ये तर्फे सावर्डे रस्त्यावर दरड कोसळली असून वाहतूक थांबवण्यात आली आहे.

रत्नागिरी तालुक्यात भंडारपुळे येथे भरतीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.  अनेक ठिकाणी नदी किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे.

जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ८३ मिमी पाऊस झाला आहे. त्यात लांजा तालुक्यात सर्वाधिक १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल रत्नागिरी (११४), संगमेश्वर व राजापूर (प्रत्येकी १०४), मंडणगड (७६), दापोली व गुहागर ( प्रत्येकी ७०) याही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. त्या तुलनेत खेड (४०) आणि चिपळूण (३७)  तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.  

पुढील ४८ तासांसाठी रेड अ‍ॅलर्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास ‘रेड अ‍ॅलर्ट’ घोषित करण्यात आला असून त्यापुढे तीन दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ राहणार आहे नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.