Babasaheb Patil resigns as Guardian Minister of Gondia district : “लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं असतं म्हणून आम्ही निवडणुकीच्या वेळी काहीतरी आश्वासनं देत असतो. पण, काय मागायचं ते लोकांनी ठरवले पाहिजे” असं वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या असंवेदनशील वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव करत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान, पाटील यांनी आता गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाबासाहेब पाटील यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या टीकेमुळे तुम्ही हे पाऊल उचललं आहे का? ते गोंदिया येथे म्हणाले होते की “जिल्ह्याचे पालकमंत्री पिकनिकल्या आल्याप्रमाणे गोंदियाला येतात, केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी झेंडावंदन करण्यासाठी जिल्ह्याला भेट देतात.” यावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, “तसं काहीच कारण नाही.”
“मी रागारारागात राजीनामा दिला नाही”
बाबासाहेब पाटील म्हणाले, “प्रफुल पटेल यांनी सांगितलं ते बरोबर आहे. आपण १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी जातो, त्यानंतर दोन-तीन महिन्यातून एकदा जातो. परंतु, पटेल यांनी टीका केली म्हणून रागारागाने मी राजीनामा दिलेला नाही. मुळात राग यायचं कारण नाही. पालकमंत्रिपदावरून थोडी गैरसोय होते. परंतु, सगळंच काही मनासारखं होणार नाही. कारण राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे.
तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे तडजोडी कराव्या लागतात : पाटील
यावेळी पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला तुमच्या लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं असं वाटत होतं का? गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिलं गेलं यामुळे नाराज होता का? या प्रश्नावर उत्तर देताना पाटील यांनी सांगितलं की “नाराजीचं काही कारण नाही. तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे थोड्या तडजोडी कराव्याच लागतात.”
“मला लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं असं वाटत होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील तीच इच्छा होती. परंतु, ते पालकमंत्रिपद शिवेंद्रराजे भोसले यांना दिलं गेलं. युतीत थोड्या तडजोडी कराव्या लागतात. पाकलमंत्रिपदांमध्ये फेरबदल केले तरी मी काही मागणी करणार नाही. मी यापूर्वी देखील कधी तशी मागणी केली नव्हती.”
राजीनाम्याचं कारण काय
प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. पाटील यांच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरही त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. पाय दुखत असल्यामुळे लांबचा प्रवास करता येत नाही असंही त्यांनी सांगितलं.