उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशिदीबाबत एक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण केला आहे. चंद्रकांत पाटील काल (१० एप्रिल) एका मुलाखतीत म्हणाले की, बाबरी पाडली तेव्हा तिथे शिवसैनिक नव्हते. या वक्तव्यानंतर शिवेसेनेचा ठाकरे गट चंद्रकांत पाटलांवर संतापला असून आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दरम्यान, बाबरी खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेले शिवसैनिक पवन पांडेदेखील चंद्रकांत पाटील यांच्यावर संतापले आहेत. पांडे म्हणाले की, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चुकीचं आहे. बाबरी मशीद भाजपाने नाही तर शिवसैनिकांनी पाडली. बाबरी मशीद सुरक्षित राहावी, असा प्रयत्न भाजपा आणि आरएसएसने केला. मी चंद्रकांत पाटलांना सांगू इच्छितो की, बाळासाहेब नोव्हेंबर महिन्यातच (बाबरी पाडण्याच्या एक महिना आधी) म्हणाले होते की, आम्ही प्रतिकात्मक कारसेवा करणार नाही. राजकीय पोळी भाजता यावी यासाठी भाजपा बाबरी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
हे ही वाचा >> बाबरीसंदर्भातली चंद्रकांत पाटलांची भूमिका व्यक्तिगत, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी स्पष्ट केली भाजपाची भूमिका, म्हणाले…
“५,००० शिवसैनिक बाबरी मशिदीत धडकले”
पांडे म्हणाले की, स्वर्गीय रामचंद्र परमहंस आणि बाळासाहेबांमुळे ५,००० शिवसैनिक बाबरीजवळ पोहोचले. शिवसैनिकांनी तिथले बॅरिकेट्स तोडले आणि आत जाऊन बाबरी पाडली. त्यानंतर बाळासाहेब म्हणाले, माझ्या शिवसैनिकांनी हे काम केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. आजही शिवसैनिकांकडे तिथले दगड आहेत. त्या खटल्यात अनेक शिवसैनिकांची नावं आहेत. बाळासाहेबांवरही खटला दाखल करण्यात आला आहे. आधी सरकार विरुद्ध बाळ ठाकरे असा खटला होता, जो पुढे सरकार विरुद्ध पवन पांडे असा चालला. या खटल्यातील प्रमुख आरोपींमध्ये १५ शिवसैनिकांची नावं होती. पवन पांडे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. पांडे म्हणाले की, शिवसैनिकांनी त्यावेळी सांगितलं आम्हाला बाबरी पाडल्याची कोणतीही खंत नाही. चंद्रकांत पाटलांनी केलेलं वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे.